अनुभव घ्या..! तुम्ही समुद्रात उभे आहात व पेंग्विन आणि मासे तुमच्या जवळपास खेळताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 07:59 PM2023-04-27T19:59:23+5:302023-04-27T20:01:34+5:30
Nagpur News तुम्ही समुद्रात उभे आहात आणि व्हेल मासे, पेंग्विन तुमच्या जवळपास खेळत आहेत असा अनुभव देणाऱ्या ‘हाॅल ऑफ ऑगमेंटेड रियालिटी’ या नव्या दालनाचा प्रारंभ उद्या २८ रोजी रमण सायन्स सेंटरमध्ये होत आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : पूर्वी टीव्हीची स्क्रीन पाहताना आपण त्या स्क्रीनमध्ये असताे तर, असे वाटायचे. या कल्पना आता खऱ्या व्हायला लागल्या आहेत. नवतंत्रज्ञानाच्या या युगात आभासी माध्यमांनी आपल्या कल्पनांना खरे रूप दिले आहे. तुम्ही असता आपल्या ठिकाणी, पण वाटेल की तुम्ही समुद्राजवळ उभे आहात आणि पेंग्विन, माेठे व्हेल मासे, पांढरे अस्वल तुमच्या आसपास खेळत आहेत. अशा आभासी दुनियेची सफर यापुढे रमन विज्ञान केंद्रात हाेणार आहे.
अनेक वैज्ञानिक प्रयाेग, माहितीच्या प्रत्यक्ष सादरीकरणातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जग आणि अंतराळाची सफर घडविणाऱ्या रमन विज्ञान केंद्र व तारामंडळात ‘हाॅल ऑफ ऑगमेंटेड रियालिटी’ या नव्या दालनाची भर पडली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता या नव्या गॅलरीचे उद्घाटन हाेणार आहे. यावेळी नीरीचे संचालक डाॅ. अतुल वैद्य, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईचे संचालक उमेश कुमार व रमन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक अर्णब चॅटर्जी उपस्थित राहतील. मिनिरल एक्स्प्लाेरेशन कार्पाेरेशन लिमिटेड, नागपूरच्या सीएसआर कार्यक्रमाद्वारे ही गॅलरी तयार करण्यात आली आहे.
या डिजिटल गॅलरीत आठ नव्या गाेष्टींचा समावेश
- आभासी तलाव ज्यावर पाय ठेवल्यास तलावाच्या पाण्यात तरंग उठल्याचा व मासे दूर जात असल्याचे दिसेल.
- एका प्रयाेगात मानवी शरीरातील मज्जातंतू, मांसपेशी, हाडे, रक्तवाहिन्या, डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि इतर अवयवांचे आकलन हाेईल.
- ‘पाॅप दि एलिमेंट’मध्ये रसायनशास्त्रातील घटकांची डिजिटल माहिती मिळेल.
- ‘टाॅप टेन एलिमेंट ऑफ वर्ल्ड’ मध्ये टेबल टेनिससारख्या आभासी खेळातून जगातील सर्वात महाग १० धातूंची माहिती मिळेल.
- ‘लाइन टू लाईव्ह’ मध्ये तुम्ही तुमच्या माेबाइलवर माशाला जसा रंग दिला तसाच मासा समाेरच्या फिशटॅंकमध्ये पाेहताना दिसेल.
- जिओग्राफिकल मॅपिंगमध्ये वेगवेगळ्या भूभागाचे डिजिटल मॅपिंग कसे हाेते, ते तुम्हाला प्रत्यक्ष प्रयाेग करून समजता येईल.
- एका प्रयाेगात तुम्ही शरीराचे जसे हावभाव कराल, त्या हावभावांचे विश्लेषण समाेरच्या संगणकाच्या स्क्रीनवर पाहता येईल.