२६ मे रोजी अनुभवा ‘झिरो शॅडो डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:57 AM2019-05-10T10:57:04+5:302019-05-10T10:57:28+5:30
अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली भरदिवसा साथ सोडणार. होय, येत्या २६ मे रोजी ही सावली अजिबात दिसणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली भरदिवसा साथ सोडणार. होय, येत्या २६ मे रोजी ही सावली अजिबात दिसणार नाही.
खगोलशास्त्राच्या भाषेत याला ‘शून्य सावली दिवस’ (झिरो शॅडो डे) असे संबोधले जाते. खगोलशास्त्र तज्ज्ञानुसार येत्या २६ मे रोजी भर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी हा शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. जिल्ह्यात २४ ते २८ मे याकाळात शून्य सावलीचा अनुभव येईल. या क्षणी आपली सावली आपल्या पायाखाली पडते व जणूकाही ती गायब झाली असे वाटते. ही खगोलीय घटना रोमांचकारी अनुभवच आहे. तज्ज्ञांच्यानुसार पृथ्वीचा धु्रव २३.५ अंश उत्तरेकडे कलल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन होते. त्यामुळे सूर्य विषुववृत्तापासून दक्षिणेकडे २३.५ अंश आणि उत्तरेकडे २३.५ अंश भ्रमण करताना दिसतो. एखाद्या अंशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येते. सूर्याचा आंशिक कोन मोठा असल्याने एकाच दिवशी दोनदा शून्य सावली अनुभवता येते. वर्षातून दोनदा सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. मे महिन्यात ३ ते ३० मे दरम्यान १५ ते २२ उत्तर अक्षांशावर महाराष्टष्ट्रात शून्य सावली दिवस घडतो. राज्यात २० ते ३० मेदरम्यान आणि १६ जुलै व ५ आॅगस्टदरम्यान शून्य सावली दिवसाचा अनुभव येईल. मकरवृत्त दक्षिणेकडच्या भागात आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधी डोक्यावर येत नाही. पण दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना सूर्य वर्षातून दोनदा डोक्यावर आल्याचा अनुभव येतो व शून्य सावलीचा अनुभव मिळतो.