आदिवासी आणि ग्रामीणांच्या गरजांवर फोकस करून प्रयोग करावेत : अनुश्री मलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:55 PM2020-02-28T22:55:34+5:302020-02-28T22:56:50+5:30
वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलिक यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विज्ञानाचे नाव आले तर प्रयोगशाळेचा उल्लेख होतो. प्रयोगशाळेत केवळ उपलब्ध नमुन्यांवर प्रयोग होतात. त्यामुळे विज्ञान केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता त्याबाहेरील विज्ञानावर लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही जे प्रयोग करीत आहोत त्याची समाज वा इंडस्ट्रीला गरज आहे का, हे पाहण्याची आवश्यकता आहे. वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलिक यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थानमध्ये (नीरी) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जवाहर नवोदय विद्यालय, नवेगांव खैरीचे डॉ. जरीन कुरैशी, नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित, डॉ. जे.एस. पांडेय आणि प्रकाश कुंभारे उपस्थित होते.
मलिक म्हणाल्या, प्रयोग करताना अनेकदा आम्हाला विफलता मिळते. परंतु निराश न होता पुढे जावे. त्यांनी सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड टेक्नालॉजीतर्फे करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. बायोगॅसवर कार चालविणे, वॉटरलेस युरिनल, महुआच्या फूलांपासून कॅन्डी तयार करणे, उत्पादनातून दुषित पदार्थ वेगळे करणे, बायोडायव्हर्सिटी पार्क विकसित करणे, ८० टक्के वेस्टचा रियूज करणे आदींची माहिती दिली.
डॉ. पुरोहित म्हणाले, यावर्षी ‘वुमन इन सायन्स’ ही विज्ञान दिनाची थीम आहे. समाजाच्या विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांची उदाहरणे दिली. डॉ. पांडेय यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचालन एस. लांबा आणि प्रकाश कुंंभारे यांनी आभार मानले. या प्रसंगी नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
‘विज्ञान ज्योती’ प्रकल्पाचे उद्घाटन
याप्रसंगी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प ‘विज्ञान ज्योती’चे उद्घाटन करण्यात आले. डॉ. जरीन कुरैशी म्हणाले, भारत सरकारने महिला आणि विद्यार्थिनींमध्ये विज्ञानाची आवड आणि महिला व पुरुष वैज्ञानिकांचे प्रमाण समान करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्याच्या संचालनाची जबाबदारी नवोदय विद्यालय समितीकडे दिली आहे. याअंतर्गत देशातील ५० जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूरचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून अकरावी विज्ञान इयत्तेतून ५० मुलींची निवड केली आहे.
नवोदय विद्यालयात ५० विद्यार्थिनी नसल्यास तेथील केंद्रीय विद्यालय, केंद्र सरकारच्या शाळा आणि राज्य सरकारच्या शाळांमधून विद्यार्थिनींना निवडण्यात येणार आहे. दरवर्षीकरिता २० लाख रुपये प्रकल्पासाठी वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थिनीला एक हजार रुपये शिष्यवृत्ती आणि संशोधन कार्यासाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत वर्षभर वैज्ञानिक, रोल मॉडेलची मुलाखत, एनजीओ, प्रयोगशाळांना भेट, संशोधन कार्य आणि पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.