राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासासाठी तज्ज्ञ समिती; घोषणांसोबतच अंमलबजावणीचाही निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:16 AM2022-12-30T05:16:43+5:302022-12-30T05:18:12+5:30
एन. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेत सल्लागार परिषद स्थापन करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात येईल. राज्य विकासाचे २०४७ पर्यंतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मित्र ही संस्था येत्या १ जानेवारीपासून सुरू होईल. तसेच राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली जाईल, अशा महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केल्या.
देश मजबूत होण्यासाठी महाराष्ट्र मजबूत हवा. विदर्भ मजबूत तर महाराष्ट्र मजबूत, विदर्भाचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे, अशी भावना व्यक्त करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी विदर्भ विकासाच्या घोषणांचा पाऊस तर पाडलाच पण या घोषणांची कालबद्ध पूर्तता केली जाईल, असा निर्धारही व्यक्त केला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मूल्य साखळ्या स्थापन करण्यासाठी तीन हजार कोटी रुपये सरकार देईल, असे ते म्हणाले. सत्तापक्ष आणि विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी हे घोषणाच नाही तर काम करणारे सरकार आहे, असे सुनावले.
समृद्धी महामार्ग विविध राज्यांनादेखील जोडणार
- आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांपर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाईल. नांदेड, जालना, अमरावती, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तो नेला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. समृद्धीचा गोसीखुर्द प्रकल्प होऊ द्यायचा नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला.
- मुख्यमंत्र्यांच्या घोषणांना फडणवीसांचीही साथ शिंदे यांच्यापूर्वी उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय, ऊर्जा क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा केल्या. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक सर्वंकष धोरण तयार केले जात आहे. ते लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे, आली संकटे कितीही त्यावर, सोबत करू मात रे’, या ओळींतून त्यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले.
विधानसभाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता एकतर्फी सभागृह चालवले जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. विधिमंडळ सचिवांकडे हा अविश्वास ठराव देण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून अध्यक्षांवर एकतर्फी कामकाज चालवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता सत्ताधारी आमदारांना बोलण्याची संधी दिली जात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांवर केला आहे.
विकास मंडळाच्या पुनर्गठनासाठी केंद्राला विनंती
विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या समतोल विकासाबाबत सरकारला शिफारशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. या आधी दांडेकर समिती व नंतर डॉ. विजय केळकर समिती नेमण्यात आली होती. राज्यातील तिन्ही विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राला विनंती केली असून ते होताच अनुशेषासंबंधीची समिती स्थापन केली जाईल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"