मुंबईच्या तज्ज्ञांनी घेतला नागपूरच्या कोविडचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:32 PM2020-09-04T22:32:48+5:302020-09-04T22:35:14+5:30
‘एकछत्री समन्वयात’ या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करीत कोरोना प्रतिबंध शक्य आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी आज येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी टेस्टिंग, अॅम्ब्युलन्स सेवा, रुग्णालय आणि रुग्णाचे व्यवस्थापन यावर भर देत यासाठी दीर्घकालीन संघर्ष करण्याचा मंत्र मुंबईवरून आलेल्या तज्ज्ञ समितीने दिला. तब्बल सहा तास चाललेल्या या मॅराथॉन बैठकीत नागपुरातील कोविडचा आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या वाढता प्रभाव रोखण्यासाठी तपासणी करणे, क्वारंटाईन करणे आणि आवश्यक वैद्यकीय उपचाराची यंत्रणा बळकट करणे, या त्रिसूत्रीवर मुंबईमध्ये उद्रेक नियंत्रणात आणता आला. याप्रमाणे नागपूर येथे देखील झोननिहाय वॉर रूम तयार करून ‘एकछत्री समन्वयात’ या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करीत कोरोना प्रतिबंध शक्य आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी आज येथे केली.
नागपूर शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या बघता मुंबईतील धारावी व कोळीवाडा येथील कोरोना उद्रेक ज्या पद्धतीने नियंत्रणात आणला, त्याच पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चहल हे उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळासह शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. या पथकात डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुजल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा सहभाग होता.
राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मावळते पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीनंतर या पथकातील सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चहल म्हणाले की, आकडेवारीवरून परिस्थितीचे मूल्यांकन करू नये, घाबरू सुद्धा नये. हा संसर्ग कधी जाणार कुणीही दावा करू शकत नाही. त्यामुळे टेस्टिंग, अॅम्ब्युलन्स, रुग्णालय व रुग्णांचे व्यवस्थापन यावर भर द्यायला हवा. रुग्णांना खाटा उपलब्ध होत आहेत की नाही, यावर लक्ष असावे. त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्स आहे की नाही, हे सुद्धा पहावे.