विशेषज्ञ केवळ फलकावरच; नागपुरातील दवाखाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:31 AM2019-07-23T11:31:28+5:302019-07-23T11:33:17+5:30
शहरातील गोरगरीब रुग्णांना विशेषज्ञ डॉक्टरांची सेवा घडावी म्हणून महानगरपालिकेच्या प्रभाकरराव दटके महाल येथील रोग निदान केंद्रात मानद (ऑनररी) सेवेवर १५ वर डॉक्टरांचा समावेश आहे.
सुमेध वाघमारे/
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील गोरगरीब रुग्णांना विशेषज्ञ डॉक्टरांची सेवा घडावी म्हणून महानगरपालिकेच्या प्रभाकरराव दटके महाल येथील रोग निदान केंद्रात मानद (ऑनररी) सेवेवर १५ वर डॉक्टरांचा समावेश आहे. प्रत्येकांचे दिवस ठरले आहेत. महिन्यातून केवळ आठच दिवस त्यांना सेवा द्यायची आहे. त्या मोबदल्यात मनपा त्यांच्या खात्यात दर महिन्याला पाच हजार रुपये मानधन जमा करते. परंतु यातील अनेक डॉक्टर त्यांच्या ठरलेल्या दिवशी येतच नसल्याचा रुग्णांच्या तक्रारी आहेत. ‘लोकमत’चमूने दवाखान्याच्या विशेषज्ञ तपासणी विभागाची पाहणी केली असता येथे शुकशुकाट दिसून आला. अनेक डॉक्टर सकाळी १०.३० वाजेपर्यंत पोहोचलेले नसतात. धक्कादायक म्हणजे, हे डॉक्टर येणार की नाही, याची माहितीही कुणालाच नसते. कोट्यवधी रुपये खर्चून मनपाचे दवाखाने चालविले जातात. परंतु वरिष्ठांचा वचक नसल्याने दुरवस्था झाली आहे. यातच मनमानीपणा सुरू असल्याने येथे रुग्णांची खरच काळजी घेतली जाते का, हा प्रश्न उपस्थित होतो. प्रभाकरराव दटके महाल येथे रोग निदान केंद्रात स्त्री रोग तज्ज्ञापासून ते शल्यक्रिया तज्ज्ञापर्यंत डॉक्टर सेवा देत असल्याचे फलक लागले आहेत. विशेषज्ञ डॉक्टरांची सेवा मिळेल या आशेने मोठ्या संख्येत रुग्ण येतात. सकाळी ८ वाजतापासून बसून असतात. परंतु अनेक विशेषज्ञ येतच नसल्याने रुग्णांना परत जावे लागते. मनपा प्रशासन अशा डॉक्टरांवर ‘मेहेरबान’का, याचे उत्तर येथील एका अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखविले.
विशेषज्ञ तपासणी विभागात शुकशुकाट
विशेषज्ञ तपासणी विभागात लावलेल्या फलकानुसार दर शनिवारी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मनिषा तामस्कर , बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल पाटील, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. राजेंद्र देशमुख, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राजू देवघरे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अशोक शेंदरे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद हरदास व शल्यक्रिया तज्ज्ञ डॉ. विजय तामस्कर आदी मानसेवी तज्ज्ञाचा सेवेचा दिवस आहे. या ठिकाणी पाहणी केल्यानंतर यातील एकही डॉक्टर आले नव्हते. विभागात शुकशुकाट होता. सर्वांचे कक्ष उघडले होते, पंखे, ट्युबलाईट सुरू होते. खाली ‘ओपीडी’मध्ये रुग्ण प्रतीक्षेत होते, परंतु डॉक्टरच नव्हते.
औषधे उघड्यावर
दवाखान्यात ओपीडी भागातच औषध वितरणाची खिडकी आहे. परंतु नियोजन नसल्यामुळे की काय उघड्यावर औषधे पडली असल्याचे दिसून आले. विशेषत: ‘रेफ्रीजरंट जेल’चे पॅकेट व डबे जागोजागी पडून होते. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारले असता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊन जा, असे उत्तर दिले.
नेत्ररोगाची यंत्रसामुग्री उघड्यावर
विशेषज्ञ तपासणी विभागात किरकोळ शस्त्रक्रिया कक्ष आहे. या कक्षामध्ये नेत्ररोगाशी संबंधित यंत्र ठेवण्यात आले आहे. परंतु कक्षाला कुलूप लावण्यात आलेले नाही. विभागात कर्मचाऱ्यापासून ते डॉक्टर कोणीच नसल्याने महागडी यंत्रसामुग्री उघड्यावरच असल्याचे चित्र आहे.