देशात फुफ्फुस आकुंचनाचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:43 PM2017-11-11T12:43:58+5:302017-11-11T12:45:30+5:30
देशातील वाढते प्रदूषण व धूम्रपानामुळे फुफ्फुस आकुंचनाची जोखीम वाढत असल्याचे मत ज्येष्ठ फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. विक्रांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : देशातील वाढते प्रदूषण व धूम्रपानामुळे फुफ्फुस आकुंचनाची जोखीम वाढत असल्याचे मत ज्येष्ठ फुफ्फुस विकारतज्ज्ञ डॉ. विक्रांत देशमुख यांनी येथे व्यक्त केले आहे. मूत्रपिंड, यकृताचा आकार ज्याप्रमाणे आकुंचन पावतो, त्याचप्रमाणे शरीराला आॅक्सिजन पुरवठा करणारे फुफ्फुसही आकुंचन पावते. सरासरी लोकसंख्येत क्वचित असे रुग्ण आढळतात. मात्र, हल्लीच्या निदान तंत्रामुळे हा आजार ओळखणे सोपे झाले आहे, अशी माहिती डॉ. विक्रांत देशमुख यांनी येथे दिली.
डॉ. देशमुख म्हणाले, दर एक लाख लोकसंख्येमध्ये एकाचे फुफ्फुस आकुंचन पावते, असे वैद्यकशास्त्रातील आकडेवारी म्हणते. देशाच्या लोकसंख्येची सरासरी काढली तर आजघडीला सात लाख व्यक्ती या आजाराने ग्रस्त असल्याचा अंदाज बांधता येतो. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे आजच्या तरुणांमध्ये धूम्रपानाची संख्या वाढत आहे. हे धूम्रपान फुफ्फुसांच्या आकुंचनाची जोखीम वाढविते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रॉसिस’ (आयपीएफ) म्हटले जाते. हा गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. त्यामुळे फुफ्फुस आकुंचन पावून शरीराला आॅक्सिजन पुरविण्याची गती मंदावते. कालांतराने फुफ्फुसांवर ओरखडे वाढून गाठी तयार होतात. त्यामुळे फुफ्फुस शरीराला आॅक्सिजन पुरवू शकत नाही. दुर्दैवाने आकुंचन पावणाºया फुफ्फुसांची गती मंद करण्यापलीकडे या आजारावर वैद्यकशास्त्रात कोणतेही रामबाण औषध नाही. पूर्वी या आजारावर स्टेरॉईड दिले जायचे, परंतु आता नवीन औषधे उपलब्ध झाली असून त्याचा फायदा होत आहे, असेही ते म्हणाले.