रेल्वे अधिका-याचा प्रताप , शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:02 PM2018-05-24T17:02:44+5:302018-05-24T17:03:00+5:30
भावी पत्नीसोबत वारंवार शरिरसंबंध प्रस्थापीत केल्यानंतर आता लग्नास नकार देणारा रेल्वेतील अधिकारी आशिष हरिभाऊ मेश्राम (वय २६) आणि त्याच्या आई विरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्कार तसेच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भावी पत्नीसोबत वारंवार शरिरसंबंध प्रस्थापीत केल्यानंतर आता लग्नास नकार देणारा रेल्वेतील अधिकारी आशिष हरिभाऊ मेश्राम (वय २६) आणि त्याच्या आई विरुद्ध जरीपटका पोलिसांनी बलात्कार तसेच फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
जरीपटक्यातील २५ वर्षीय तक्रारदार तरुणी बारावी पास असून, ती खासगी नोकरी करते. वस्तीतीलच आरोपी आशिष मेश्रामसोबत तिचा १६ एप्रिल २०१७ ला साक्षगंध झाला होता. आरोपी मेश्राम रेल्वेत नोकरी करतो. सध्या त्याची नियुक्ती स्टेशन मास्तर म्हणून बडोदरा गुजरात येथे आहे. साक्षगंधात तरुणीच्या आईवडीलांनी त्याला सोन्याची अंगठी दिली होती. २५ डिसेंबर २०१७ ला या दोघांचे लग्न ठरले होते. दरम्यान, साक्षगंध झाल्यानंतर तो सुटीवर जेव्हा केव्हा नागपुरात यायचा. तेव्हा तो तरुणीसोबत शरिरसंबंध जोडायचा. लग्न होणार असल्यामुळे तरुणी त्याला विरोध करीत नव्हती. दरम्यान, तरुणीच्या परिवाराकडून लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली असता आरोपीने लग्नाची तारिख पुढे ढकलली. त्यानंतर त्याला लग्नासाठी विचारणा करताच तो वेगवेगळे कारण सांगून टाळाटाळ करू लागला. ५ मे रोजी अचानक त्याने तरुणीला फोन केला. ‘आम्ही हे लग्न करू शकत नाही. तुम्हाला लग्न करायचे असेल तर लग्नाचा संपूर्ण खर्च ५ लाख रुपये रोख स्वरूपात द्यावा लागेल’, असे म्हटले. त्याच्या या अनपेक्षीत पवित्र्यामुळे तरुणीने त्याला ठोस कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिने आपल्या पालकांना सांगितले. पालकांनी नातेवाईक तसेच मध्यस्थांना घेऊन आरोपी आशिष मेश्राम तसेच त्याची आई रत्नमाला हरीभाऊ मेश्राम यांची भेट घेतली. मेश्राम मायलेकांनी लग्न करायचे नाही, असे सांगून असंबंद्ध उत्तरे दिली. अनेकांनी समजूत काढूनही ते ऐकायला तयार नव्हते.
मुलाला अटक, आईची चौकशी
अखेर बुधवारी सायंकाळी तरुणीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार तसेच फसवणूकीच्या आरोपाखाली आशिष आणि त्याची आई रत्नमाला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आशिषला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. त्याच्या आईची वृत्तलिहिस्तोवर चौकशी सुरू होती.