अजनी यार्डात पेट्रोलच्या वॅगनमध्ये स्फोट
By admin | Published: September 26, 2015 02:57 AM2015-09-26T02:57:30+5:302015-09-26T02:57:30+5:30
मंडवादेह ते वडोदरा डिव्हिजनकडे जाणाऱ्या पेट्रोलच्या एका रिकाम्या वॅगनमध्ये गॅस जमा झाल्यामुळे
मोठी घटना टळली : रेल्वेकडे नाही स्वत:चा अग्निशमन विभाग
नागपूर : मंडवादेह ते वडोदरा डिव्हिजनकडे जाणाऱ्या पेट्रोलच्या एका रिकाम्या वॅगनमध्ये गॅस जमा झाल्यामुळे ५८ टन क्षमतेच्या वॅगनचे २०० किलोचे झाकण उडून भयानक स्फोट झाला. ही घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या सी कॅबिनजवळ सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. वॅगनमध्ये पेट्रोल नसल्यामुळे फार मोठी घटना टळली, अन्यथा अजनी परिसर जळून खाक झाला असता.
अजनी रेल्वेस्थानकाच्या सी कॅबिनजवळून सकाळी १०.३० वाजता मंडवादेह येथून २५ वॅगन घेऊन आलेली गाडी वडोदरा डिव्हिजनकडे जात होती. दरम्यान या गाडीतील वॅगनमध्ये थोडेफार पेट्रोल असल्यामुळे इंजिनपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ५८ टन क्षमतेच्या एका वॅगनमध्ये उन्हामुळे गॅस तयार झाला. अजनीचा इंग्रजकालीन पूल १०० फूट अंतरावर असताना या वॅगनचे २०० किलोचे झाकण जोरदार स्फोट होऊन १०० फूट वर फेकले गेले. यामुळे जोरदार आवाज होऊन घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. परंतु वॅगन पेट्रोलने भरलेले नसल्यामुळे मोठी हानी टळली.
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वॅगन बाजूला काढून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. अजनी परिसरात पेट्रोलने भरलेल्या गाडीला आग लागल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)
१९९६ साली विभागाचे विलिनीकरण
भारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच या विभागाची गाडी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहोचायची. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले. तेव्हापासून रेल्वेत स्वतंत्र अग्निशमन विभागच नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात.नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. एखाद्या प्रसंगी मोठी आग लागल्यास पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता उरते. धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते.