‘इंटरसिटी’मध्ये बॉम्बस्फोटाची अफवा!
By Admin | Published: October 2, 2016 03:12 AM2016-10-02T03:12:50+5:302016-10-02T03:12:50+5:30
अजनी यार्डात इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना समजली आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले.
मॉक ड्रील : रेल्वे प्रशासनाने दाखविली तत्परता
नागपूर : अजनी यार्डात इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना समजली आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. लगेच रेल्वेचे सर्व अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच मदतीसाठी भारत स्काऊट, गाईडचे विद्यार्थी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. परंतु ही खरोखरची घटना नसून ‘मॉक ड्रील’ असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सुरक्षा आणि वेळेचे पालन हा भारतीय रेल्वेचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे रेल्वेचे अपघात कमी व्हावेत हा प्रयत्न नेहमीच करण्यात येतो. परंतु तरीसुद्धा एखाद्याप्रसंगी काही अप्रिय घटना घडल्यास त्या घटनेचा गंभीर परिणाम कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन तत्पर असते. रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी आपली गुणवत्ता आणि तत्परता तपासण्यात येते.
याचाच एक भाग म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात आले. यात वरिष्ठ विभागीय सतर्कता अधिकारी एस. आर. किरार यांच्या मार्गदर्शनाखाली संभाव्य आतंकवादी कारवाया पुढे ठेऊन बनावट दुर्घटनेची योजना तयार करण्यात आली. यात वर्धा-नागपूर सेक्शनमध्ये अजनी कॅबिन आणि अजनी आरआरआय (रुट रिले इंटरलॉकिंग’ दरम्यान रेल्वेगाडी क्रमांक १२११९ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये काही असामाजिक तत्त्वांनी बॉम्बस्फोट घडविला असून यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून कोचला मोठी आग लागल्याची सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच विभागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेली रेल्वेगाडी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी रवाना करण्यात आली. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची चमू, भारत स्काऊट-गाईडची मदत घेण्यात आली. या मॉक ड्रीलचा उद्देश आपात्कालीन स्थितीत करावयाची कारवाई आणि घटनेच्या वेळी प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी जाणून घेणे हा होता.
मॉक ड्रीलमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सर्व विभागांची तत्परता दिसून आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनीही घटनेची माहिती मिळताच त्वरित प्रतिसाद दिला. त्यामुळे मॉक ड्रीलच्या आयोजनाचा उद्देश यशस्वी झाला.(प्रतिनिधी)