ट्रकच्या डिझेल टाकीचे वेल्डिंग करताना स्फोट, एका कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 10:49 PM2023-05-19T22:49:22+5:302023-05-19T22:51:05+5:30
Nagpur News ट्रकच्या डिझेल टाकीचे वेल्डिंग करताना झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून गॅरेजमालकासह दोन जण गंभीर जखमी झाले. ऑटोमोटिव्ह चौकातील एका गॅरेजमध्ये हा स्फोट झाला व यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
नागपूर : ट्रकच्या डिझेल टाकीचे वेल्डिंग करताना झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून गॅरेजमालकासह दोन जण गंभीर जखमी झाले. ऑटोमोटिव्ह चौकातील एका गॅरेजमध्ये हा स्फोट झाला व यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या स्फोटात एकूण चार जण जखमी झाले होते व त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ऑटोमोटिव्ह चौकात सुखबाजसिंह चहल यांचे एस.एस.बॉडी वर्कशॉप हे गॅरेज आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सुखचंदरसिंह भुल्लर (४७, दीपकनगर) हे त्यांचा ट्रक घेऊन डिझेल टाकीच्या वेल्डिंगसाठी गॅरेजमध्ये आले. तकदीरराज कांबळे (३५, जगदंबानगर) व योगेश नटके (३४, सहयोगनगर) हे दोन कामगार तेथे होते. चहल व कांबळे यांनी डिझेल टँक कट करून आतमध्ये साफसफाईला सुरुवात केलीच असताना अचानक डिझेल टँकचा जोरदार स्फोट झाला व त्यात गॅरेजमध्ये असणारे सर्वच लोक जखमी झाले. स्फोटामुळे गॅरेजमध्ये आग लागली आणि त्यात गॅरेजमालक चहल व कांबळे हे गंभीर जखमी झाले. चहल हे सुमारे ८० टक्के भाजले तर ट्रकचालक भुल्लर हा २५ टक्के जळाला. कांबळे याला मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले तर चहल व भुल्लरला एका खाजगी इस्पितळात नेण्यात आले. योगेशवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान कांबळे याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकांनी पोलीस व अग्निशमन दलाला या स्फोटाची माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या पथकाने येऊन आगीवर नियंत्रण मिळविले. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.
टँकमधील डिझेल रिकामे केल्यावर वेल्डिंग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकच्या टँकमधील डिझेल काढण्यात आले होते. त्यानंतर वेल्डिंगचे काम सुरू झाले. मात्र काही प्रमाणात डिझेल त्यात राहिले असावे. यातूनच वेल्डिंग सुरू असताना स्फोट झाला व त्यानंतर ही दुर्घटना घडली.