नागपूरात उड्डाणपुलावर आढळला स्फोटकांचा ट्रक; तपासाअंती पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 11:52 PM2021-06-25T23:52:52+5:302021-06-26T00:08:12+5:30
पोलिसांसह एटीएसही धावली, एक ट्रक बराच वेळेपासून नागपूर-वर्धा मार्गावरच्या उड्डाणपुलावर उभा असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रतापनगर पोलिसांना मिळाली.
नागपूर - स्फोटकांनी भरलेला ट्रक उड्डाणपुलावर सोडून पळ काढत ट्रकचालकाने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडवून दिली. माहिती कळताच पोलीस आणि विविध तपास यंत्रणांसह एटीएसचे पथकही घटनास्थळी पोहचले. हा ट्रक तेथून सुखरूप बाहेर हलविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत तपास यंत्रणा करीत होत्या.
एक ट्रक बराच वेळेपासून नागपूर-वर्धा मार्गावरच्या उड्डाणपुलावर उभा असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रतापनगर पोलिसांना मिळाली. ठाणेदार दिनकर ठोसरे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे धावले. ट्रक बंद होता अन् चालक नदारद होता. त्यांनी बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर ट्रकमधील कागदपत्रे तपासली. त्यात ट्रकमालकाचा क्रमांक होता. त्यावर संपर्क केला असता या ट्रकमध्ये स्फोटके भरून असल्याची माहिती त्यांना मिळाली. अर्थातच स्फोटकांनी भरलेला ट्रक छत्रपती चाैकाजवळ (उड्डाणपुलावर) सोडून ट्रकचालक निघून गेल्याचे लक्षात आल्याने पोलिसांची धडधड वाढली. ट्रकमालकाने दिलेल्या मोबाईलवर पोलिसांनी संपर्क केला. ट्रकचालकाने डिझेल संपल्याने ट्रक तेथे सोडल्याचे सांगून परत येतो, असे म्हटले. मात्र, नंतर बरेचदा संपर्क करूनही ट्रकचालकाने प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने त्याचा मोबाईलच बंद करून टाकला. त्यामुळे पोलीस हबकले. त्यांनी वरिष्ठांसह दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) कळविले. त्यानंतर एटीएस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच अन्य तपास यंत्रणाही धडकल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. शहरात घबराट पसरू नये म्हणून पोलिसांनी याबाबत वाच्यता करण्याचे टाळले. स्फोटकांनी भरलेला ट्रक तेथून सुखरूपस्थळी हलविण्यासाठी पोलीस, बीडीडीएस आणि एटीएस प्रयत्न करीत होते.
हैदराबादहून आली स्फोटके
सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटकांनी भरून असलेला हा ट्रक हैदराबादहून नागपुरात आल्याचे समजते. तो कुणाकडे जाणार होता, ते मात्र वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.