‘किसान रेल्वे’तून विदर्भातील ६ हजार टन माल निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 12:33 PM2021-02-15T12:33:22+5:302021-02-15T12:35:03+5:30
Nagpur News अडीच महिन्यांतच किसान रेल्वेच्या माध्यमातून विदर्भातील ६ हजार टनांहून अधिक माल निर्यात करण्यात आला व केवळ संत्र्याच्या मालवाहतुकीतून रेल्वेला सुमारे दोन कोटींचा महसूल प्राप्त झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक कमी वेळेत व्हावी यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील शेतकरी व विशेषत: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. अडीच महिन्यांतच किसान रेल्वेच्या माध्यमातून विदर्भातील ६ हजार टनांहून अधिक माल निर्यात करण्यात आला व केवळ संत्र्याच्या मालवाहतुकीतून रेल्वेला सुमारे दोन कोटींचा महसूल प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मध्य रेल्वेला विचारणा केली होती. ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत नागपुरातून किती माल बाहेर पाठविण्यात आला, रेल्वे वाहतुकीतून किती महसूल प्राप्त झाला आदी प्रश्न त्यांनी विचारले होते. मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन ग्रीन’ सुरू करण्यात आले. किसान रेल्वेतून माल पाठविल्यास शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात ५० टक्के सवलत मिळेल, असे १३ ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरपासून किसान रेल्वे सुरू झाली. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत ६ हजार १७९ टन मालाची वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेला त्यातून १ कोटी ९९ लाखांचा महसूल प्राप्त झाला.
नागपूर, अमरावती, वर्धा या तीन जिल्ह्यांतील हजारो हेक्टर क्षेत्रांवर संत्र्याचे पीक घेतले जाते. याशिवाय, विदर्भात फळे व भाज्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. हा माल एरवी प्रामुख्याने ट्रकद्वारे राज्यात व देशात विविध ठिकाणी पाठवला जातो. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन’ हाती घेण्यात आले व त्यात किसान रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती.