निर्यातदारांची पसंती मिहानला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:41 AM2017-08-07T04:41:53+5:302017-08-07T04:42:17+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल, नवीन धावपट्टी आणि निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता लक्षात घेऊन लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल, नवीन धावपट्टी आणि निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता लक्षात घेऊन लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्कमुळे देशातील निर्यातदारांची पहिली पसंती मिहानला राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विमानतळाच्या परिसरातील कार्गो इमारतीमध्ये यूएस एन्टरप्राईजेस या जागतिक लॉजिस्टिक कंपनीतर्फे निर्यातदारांसाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मिहानमध्ये रामदेवबाबा यांच्या फळप्रक्रिया उद्योगासोबतच इतरही उद्योगांनी येथे उद्योग सुरू करण्यासंबंधी मागणी केली आहे. फळप्रक्रिया उद्योगाच्या निर्यातीसाठी शीतगृह साखळीची मागणी लक्षात घेऊन ही सुविधा केली आहे.
शीतगृहाची क्षमता आठ टन
दोन शीतगृहांची एकूण क्षमता आठ टन असून यूएस एन्टरप्राईजेसने १६ लाखांच्या गुंतवणुकीतून उभारणी केली आहे. केवळ आंतरराष्ट्रीय निर्यातीत औषधी, फ्रोझन फूड, भाजीपाला, आईस्क्रीम, मटर आदी माल ठेवण्यात येणार आहे. यूएस एन्टरप्राईजेसला हे काम निविदेद्वारे पाच वर्षांसाठी मिळाले असून, कंपनीला दर महिना ३० हजार रुपये भाडे (वीज बिल वगळता) आणि नफ्यातून ३३ टक्के रक्कम मिहान इंडिया लिमिटेडला द्यायची आहे.