तांत्रिकतेसोबतच मानवी स्पर्श जपा

By Admin | Published: February 23, 2017 02:02 AM2017-02-23T02:02:43+5:302017-02-23T02:02:43+5:30

संघ लोककल्याण समितीच्या नावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव आहे. रक्तपेढीचे काम तांत्रिक असले तरी त्याची गुणवत्ता वाढत राहिली पाहिजे.

Expose human touch with technicality | तांत्रिकतेसोबतच मानवी स्पर्श जपा

तांत्रिकतेसोबतच मानवी स्पर्श जपा

googlenewsNext

मोहन भागवत यांचे प्रतिपादन : डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या नवीन वास्तूचे लोकार्पण
नागपूर : संघ लोककल्याण समितीच्या नावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव आहे. रक्तपेढीचे काम तांत्रिक असले तरी त्याची गुणवत्ता वाढत राहिली पाहिजे. तांत्रिकबाजू जपताना त्याला मानवी स्पर्श झाला पाहिजे. त्यात आत्मीयता असली पाहिजे. ती जपली पाहिजे. ही संघाची कार्यशैली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीद्वारा संचालित डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या नवीन वास्तूचे लोकार्पण बुधवारी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यानिमित्त रामनगर मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीचे सचिव दत्ता टेकाडे, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, सचिव अशोक पत्की उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, सुरुवातीला अत्यंत लहान स्वरुपात संघाचे कार्य सुरू झाले. हळूहळू ते देशव्यापी झाले. आज या कार्याचा वटवृक्ष झाला आहे. सर्व समाजात चैतन्याचे झरे वाहावे यासाठी हे कार्य उभे करण्यात आले आहे. मैत्री, करुणा याचा साज घेऊन कार्य वाढवून घेण्याचा स्वयंसेवकाचा प्रयत्न असतो. यातून संघ प्रगट होत असतो. कार्यकर्त्यांनी स्वत:चे रक्त आटवून ही रक्तपेढी उभी केली आहे. या रक्तपेढीचा व लोककल्याण समितीच्या वाढत्या आवाक्यामुळेच नवीन वास्तूत हे स्थानांतरण झाले आहे. परिश्रमाच्या आधारे एक वैभव उभे राहते. आनंदाचा भरामध्ये ते विसरुन जायला नको. जे ब्रीद हाती घेतले आहे, ते तडीस नेले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अशोक पत्की म्हणाले, गेल्या २४ वर्षात डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे कार्य आता समाजातील सर्व स्तरापर्यंत, तळागळापर्यंत पोहचले आहे. या क्षेत्रातील एक मानदंड म्हणून प्रस्थापित झाले आहे. आतापर्यंत लाखो रक्तपिशव्याचे रक्तसंकलन करून त्यापेक्षा कितीतरी जास्त रुग्णांना रक्त व रक्तघटकाचे वितरण केले आहे.
गरीब, श्रीमंत, जाती, पंथ, पक्ष याकडे न बघता केवळ तो रुग्ण आहे याच विचारातून या रक्तपेढीचे कार्य सुरू आहे. मध्यभारतातील एक अत्यंत सुरक्षित व अत्याधुनिक रक्तपेढी म्हणून डॉ. हेडगेवार रक्तपेढी प्रसिद्ध आहे. आता ‘नॅट’मुळे रक्तपेढीवरील विश्वास द्विगुणित झाला आहे. नुकतेच २०१६ या वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यसरकारतर्फे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची उत्कृष्ट रक्तपेढी म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक डॉ. दिलीप गुप्ता यांनी केले. दरम्यान डॉ. हेडगेवार रक्तपेढीची ‘स्थलांतर स्मरणिका’चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. रक्तपेढीच्या नव्या वास्तूसाठी ज्यांनी मदत केली त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन मंजुषा कानडे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला ज्येष्ठ संघ विचारक मा. गो. वैद्य, प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे, खा. डॉ. विकास महात्मे, माझी खा. दत्ता मेघे, आ. सुधाकर देशमुख, आ. नागो गाणार, आ. परिणय फुके, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. विनयकुमार गोवर्धन, डॉ. अशोक अरबट, डॉ. विरल कामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Expose human touch with technicality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.