कामठीत एक्सप्रेस गाड्या थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:12 AM2021-08-25T04:12:52+5:302021-08-25T04:12:52+5:30
कामठी: गार्ड रेजिमेंटल सेंटर असलेल्या कामठीत देशभरातील सैनिक प्रशिक्षणासाठी येतात. मात्र लॉकडाऊनपासून या रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नसल्याने ...
कामठी: गार्ड रेजिमेंटल सेंटर असलेल्या कामठीत देशभरातील सैनिक प्रशिक्षणासाठी येतात. मात्र लॉकडाऊनपासून या रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नसल्याने सैनिकासह प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गावरील कामठी रेल्वे स्थानकावरून ३० एक्स्प्रेस गाड्या धावत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी येणाऱ्या सैनिकांना कामठी रेल्वे स्टेशन ओलांडून नागपूर रेल्वे स्टेशनवर उतरून परत कामठीला यावे लागत असे. नागपूर हावडा रेल्वेमार्गावरून आजाद हिंद एक्स्प्रेस, रायगड-निजामुद्दीन एक्स्प्रेस, अहमदाबाद पुरी एक्स्प्रेस, बॉम्बे हावडा मेल, गीतांजली मुंबई हावडा एक्स्प्रेस, कर्मभूमी एक्स्प्रेस, हावडा साईधाम एक्स्प्रेस, हटिया पुणे एक्स्प्रेस, पुरी जयपुर एक्स्प्रेस अशा अनेक महत्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना सध्या कामठी रेल्वे स्थानकावर थांबा नाही. त्यामुळे सैनिक व सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतो आहे.
२०१२-१३ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी कामठी रेल्वे स्टेशनवर अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या थांबणार असल्याचे आश्वासन देत या रेल्वे स्टेशनला जिल्ह्यातील मॉडेल रेल्वेस्टेशन बनवणार सांगितले होते. २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्तापरिवर्तन झाले. भाजपची सत्ता आल्याने नागरिकांच्या आशा बळावल्या. मात्र भाजपच्या काळातही कामठी रेल्वे स्टेशनवर ना नव्या गाडीला थांबा मिळाला ना येथील पायाभूत सुविधांचा विकास झाला.
कधी होणार मेकओव्हर?
कामठी रेल्वे स्टेशन वरून प्रतिदिन सकाळपासून तर रात्रीपर्यंत हजारो नागरिक नागपुरात रोजगार व इतर महत्त्वाच्या कामाकरिता जाणे-येणे करीत असतात. रेल्वे स्टेशनवर सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे अनेक लुटमारीच्या घटना घडत असतात. दोन वर्षापूर्वी सैनिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेल्या सैनिकाला रात्र झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवरच झोपावे लागले होते. रात्री २ च्या सुमारास गुंडांनी चाकूच्या धाक दाखवून त्याचे जवळील रोख रक्कम लुटली होती. रात्रीच्यावेळी रेल्वे स्टेशन समोरील पथदिवे सतत बंद असतात. त्यामुळे या परिसरातील गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. गावगुंड रात्रीला कामठी रेल्वे स्टेशनवर आश्रय घेत असतात. रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर नेहमीच अस्वच्छता राहते.