नोटीफायबल डिसीज म्हणून कॅन्सरची नोंद होण्याची गरज व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:32 PM2018-02-05T12:32:18+5:302018-02-05T12:34:57+5:30

कर्करोग ‘नोटीफायबल डिसीज’मध्ये येत नाही. परिणामी कुठला कर्करोग वाढत आहे, किती रुग्ण आहेत याची नोंदच होत नसल्याने या रोगावरील नियंत्रणात शासन कमी पडत आहे, असे मत मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी येथे मांडले.

Expressing the need to register cancer as a notifible disease | नोटीफायबल डिसीज म्हणून कॅन्सरची नोंद होण्याची गरज व्यक्त

नोटीफायबल डिसीज म्हणून कॅन्सरची नोंद होण्याची गरज व्यक्त

Next
ठळक मुद्देनागपूर मेडिकल कॉलेजच्या कृष्णा कांबळे यांचे मतनागपुरात जागतिक कर्करोग दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात ‘एचआयव्ही’, स्वाईन फ्लू आदी रोगांची ‘नोटीफायबल डिसीज’ म्हणून नोंद होते. त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न होतात, परंतु कर्करोग ‘नोटीफायबल डिसीज’मध्ये येत नाही. परिणामी कुठला कर्करोग वाढत आहे, किती रुग्ण आहेत याची नोंदच होत नसल्याने या रोगावरील नियंत्रणात शासन कमी पडत आहे, असे मत मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी येथे मांडले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) कर्करोग विभागाच्यावतीने जागतिक कर्करोग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मंचावर कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवाण, पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. उदय नार्लावार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. लांजेवार, डॉ. पी.आर. भातकुले आदी उपस्थित होते.
डॉ. अशोक दिवाण म्हणाले, कॅन्सरबद्दल आजही लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अनेक प्रकारच्या काल्पनिक किंवा केवळ ऐकिवात असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून असतात. परंतु प्रारंभिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. नवीन आणि महत्त्वपूर्ण संशोधनानी कॅन्सरला मोठ्या प्रमाणात उपाचारयोग्य बनविले आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि प्रभावी औषधे या सर्वांमुळे आता कॅन्सरसोबत सामान्य जीवन जगणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. उदय नार्लावार म्हणाले, सुरुवातीलाच कॅन्सरचे निदान झाल्यास उपचाराची यशस्विता वाढते, परंतु उशीर झाल्यास कॅन्सरची गुंतागुंत वाढून उपचाराची यशस्विताही कमी होते. यामुळे प्रत्येकाने कॅन्सरविषयी जास्तीतजास्त माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. संचालन श्याम पंजाला यांनी केले. कर्करोग विभागात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप रुग्णांना फळांचे वाटप करून करण्यात आले.

Web Title: Expressing the need to register cancer as a notifible disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.