चित्रकारांच्या अभिव्यक्तितून अस्वस्थ भारताचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:40 PM2018-10-19T23:40:16+5:302018-10-19T23:43:49+5:30
गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ करणारे वास्तव दिसत आहे. साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांनी याविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कलावंतांनी आवाज उठवला की, तो दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो हा जगाचा इतिहास आहे. परंतु लक्ष्य केले जाते म्हणून गप्प राहू नका कारण गप्प राहिले तरी लक्ष्य व्हाल. त्यापेक्षा सामुदायिकपणे या अस्वस्थ वातावरणाविरुद्ध आवाज उठवा, असा संदेश देत सेक्युलर चित्रकला प्रदर्शनाला शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही वर्षात देशात वाढलेली असहिष्णूता हे चिंतनाचे व चिंतेचे कारण ठरले आहे. वाढलेली धर्मांधता, जातीय हिंसाचार, गाईच्या नावाने हिंसक होणारा समाज, विरोधकांना लक्ष्य करणे, असे अनेक प्रश्न आणि या सर्वांमध्ये भरडला जाणारा सामान्य नागरिक, असे अस्वस्थ करणारे वास्तव दिसत आहे. साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांनी याविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कलावंतांनी आवाज उठवला की, तो दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न होतो हा जगाचा इतिहास आहे. परंतु लक्ष्य केले जाते म्हणून गप्प राहू नका कारण गप्प राहिले तरी लक्ष्य व्हाल. त्यापेक्षा सामुदायिकपणे या अस्वस्थ वातावरणाविरुद्ध आवाज उठवा, असा संदेश देत सेक्युलर चित्रकला प्रदर्शनाला शुक्रवारी नागपुरात सुरुवात झाली.
अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर, माजी पोलीस सहा.आयुक्त भरत शेळके, डॉ. अशोक गायकवाड, माजी कला संचालक प्रा. हेमंत नागदिवे, ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके, इ.मो. नारनवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मध्यवर्ती संग्रहालयाच्या (अजब बंगला) कलादालनात या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे संचालन बबन चहांदे यांनी केले तर तुका कोचे यांनी आभार मानले. गौतमीपुत्र कांबळे यांच्या संकल्पनेतील हे चित्रप्रदर्शन यापूर्वी कोल्हापूर येथे भरविण्यात आले होते. प्रा. प्रमोदबाबू यांच्यासह प्रा. मोग्गलान श्रावस्ती, प्रा. प्रकाश भिसे, प्रा. बाळासाहेब पाटील, प्रा. दिलीप बडे, नंदकुमार जोगदंड, प्रा. राजेंद्र महाजन, राजू बाविस्कर, सिकंदर मुल्ला, फारूक नदाफ, विक्रांत भिसे, निखिल राजवर्धन, गोपानाथ गंगवाने, सतीश गायकवाड, स्नेहा अलास्कर, अभिजित साळुंखे, सुनील अवचार अशा देशातील ४० नामवंत चित्रकारांच्या चित्रकृती यामध्ये समाविष्ट आहेत.
सेक्युलर विचारांना मानणाऱ्या देशभरातील चित्रकारांनी देशातील अस्वस्थता रेखाटून मनातील खदखद त्यांच्या चित्रांद्वारे व्यक्त केली आहे. भारतीय संविधान व प्रतीक राजमुद्रा यांच्या भोवताल घोंगावणारे कावळे व त्यामुळे धोक्यात आलेली लोकशाही, घरच्या पिंजऱ्यात आणि पिंजऱ्याबाहेरही असुरक्षित आणि दु:खी असलेली स्त्री, पुन्हा पुराणवादाकडे घड्याळाचे उलटे फिरणारे काटे, लैंगिक असमानता, व्यवस्थेच्या चक्कीत पिसला जाणारा सामान्य माणूस, संविधानामुळे स्त्रीला उंच उडण्यासाठी मिळालेले पंख अशा अप्रतिम कलाकृतींचे दर्शन या प्रदर्शनात होत आहे, जे कोणत्याही संवेदनशील माणसांना नक्कीच भावणारे आहे. २१ आॅक्टोबरपर्यंत हे चित्रप्रदर्शन चालणार आहे.