वादग्रस्त मुदगल याची भाजपमधून हकालपट्टी; १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 07:05 PM2022-09-10T19:05:21+5:302022-09-10T19:06:06+5:30
Nagpur News महिलेशी अश्लील संवाद आणि विशिष्ट धर्माविषय वादग्रस्त विधान करणे उमरेड पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हामंत्री डॉ. मुकेश दत्तात्रय मुदगल यांच्या अंगलट आले आहे.
नागपूर : महिलेशी अश्लील संवाद आणि विशिष्ट धर्माविषय वादग्रस्त विधान करणे उमरेड पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हामंत्री डॉ. मुकेश दत्तात्रय मुदगल यांच्या अंगलट आले आहे. यासंदर्भात मुदगल यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची शुक्रवारी भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी शुक्रवारी जारी केले.
याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात कदीर मकबूल शेख (३९, रा. कावरापेठ उमरेड) यांनी तक्रार नोंदविली होती. गुरुवारी (दि. ८) भांदवी कलम १५३(अ), २९५(अ) अन्वये गुन्हा दाखल करीत मुकेश मुदगल याला अटक करण्यात आली होती.
शुक्रवारी (दि.९) उमरेड न्यायालयात मुदगल याला हजर करण्यात आले, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर शनिवारी उमरेड न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मुदगल याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबला
संभाषणाची क्लिप आणि आवाज एकच आहे अथवा नाही याबाबतची तपासणी करण्यासाठी आवाजाचे नमूने फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले जाणार आहेत. शिवाय डॉ. मुकेश मुदगल आणि संबंधित महिला यांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून एसडीआर, सीडीआरची सुद्धा तपासणी केली जाणार आहे.
राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे चहापेक्षा केटली गरम ही म्हण याप्रकरणात तंतोतंत बसते. कुणाच्याही धर्माविषयी अपशब्दात, खोडसाळ टिप्पणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पक्षाचे प्रमुख नेतेच अशाप्रकारे बरळायला लागले तर मग कार्यकर्त्यास काय सांगणार?
राजेंद्र मुळक
अध्यक्ष, नागपूर जिल्हा (ग्रामीण) कॉंग्रेस कमिटी