नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:48 AM2020-04-04T11:48:45+5:302020-04-04T11:49:08+5:30
विदर्भात ‘कोरोना’ तपासणी करण्याची व्यवस्था केवळ नागपुरातच आहे. त्यामुळे नमुने तपासायला वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आ. अनिल सोले यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरासह विदर्भातदेखील ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. विदर्भात ‘कोरोना’ तपासणी करण्याची व्यवस्था केवळ नागपुरातच आहे. त्यामुळे नमुने तपासायला वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आ. अनिल सोले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांना पत्रदेखील लिहिले.
नागपुरातच केवळ ‘कोरोना’ची तपासणी होते. एकूण व्यवस्थेमुळे दिवसभरात जास्तीत जास्त ५० ते ६० नमुन्यांचे परीक्षणच होऊ शकते. ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी जास्तीत जास्त तपासणी कमी वेळेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे नागपुरात जास्त मशीन आल्या पाहिजेत. आ. मोहन मते यांच्यासमवेत मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली असता तेथे ‘कोरोना’ तपासणी मशीन आली आहे व प्रयोगशाळादेखील तयार झाल्याची बाब समजली. परंतु अद्यापही ‘आयसीएमआर’ व ‘एआयव्ही’ पुणे यांची मान्यता प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्वत: यात लक्ष घालावे, अशी विनंतीदेखील सोले यांनी केली आहे. सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘व्हेंटिलेटर्स’देखील वाढविण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.