देशातील समृद्ध इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा
By Admin | Published: July 24, 2014 01:02 AM2014-07-24T01:02:57+5:302014-07-24T01:02:57+5:30
देशातील इतिहास अतिशय समृद्ध आहे. परंतु तो विस्तृतपणे लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही. त्यामुळे हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याची सुरुवात शालेय जीवनापासून व्हावी.
उमेश चौबे : लोकमत समाचारचे राजीव सिंह युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित
नागपूर : देशातील इतिहास अतिशय समृद्ध आहे. परंतु तो विस्तृतपणे लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाही. त्यामुळे हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याची सुरुवात शालेय जीवनापासून व्हावी. विद्यार्थी दशेपासूनच मुलांना इतिहासाचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे यांनी केले.
लोकमान्य टिळक आणि शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त लोटस् कल्चरल अॅण्ड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे बुधवारी सायंकाळी गांधीसागरस्थित नागपूर नागरी सहकारी बॅकेच्या सभागृहात आयोजित युवा पत्रकार पुरस्कार प्रदान समारोह आणि शहीद चंद्रशेखर आझार व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर आ.प्रा. अनिल सोले होते. तर आ. मितेश भांगडिया, आ. विकास कुंभारे, मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, डॉ. लोकेंद्र सिंग, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, पत्रकार आनंद निर्वान, लोटस् कल्चरल अॅण्ड स्पोर्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष विपुल मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी लोकमत समाचारचे उपसंपादक राजीव सिंह यांच्यासह टाइम्स आॅफ इंडियाचे अंजय्या अनपार्थी आणि लोकशाही वार्ताचे योगेश बरवड यांना युवा पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी महापौर आ.प्रा. अनिल सोले म्हणाले, लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळाल्यामुळे पुरस्कारप्राप्त पत्रकारांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आ. भांगडिया यांनी या पुरस्कारामुळे लोकमान्य टिळकांच्या विचारांपासून युवा पत्रकारांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अतुल पांडे, डॉ. लोकेंद्र सिंग, आ. विकास कुंभारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमामागची भूमिका समजावून सांगितली. गिरधारी मंत्री यांनी प्रास्ताविक केले. क्षमाशंकर तिवारी यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)