सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:23 AM2018-04-13T00:23:26+5:302018-04-13T00:23:39+5:30
विरोधकांना त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळेच संसदेच्या कामकाजात ते सातत्याने अडथळा आणत आहेत. परंतु त्यांचे सत्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे सत्य व सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विरोधकांना त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळेच संसदेच्या कामकाजात ते सातत्याने अडथळा आणत आहेत. परंतु त्यांचे सत्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे सत्य व सरकारची लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. संसदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या विरोधात राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात भाजपातर्फे नागपुरात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. बावनकुळे यांच्या उपस्थितीत या उपोषणाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.
संविधान चौकात सकाळी १० वाजल्यापासून या उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणाला शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, आ. डॉ.मिलींद माने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी खासदार अजय संचेती, नागपूर जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, ‘भाजयुमो’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. कॉंग्रेसने कशा पद्धतीने उपोषण केले, हे साऱ्या देशाने पाहिले. मात्र उपोषण नेमके कसे असावे हे भाजपने दाखवून दिले आहे. हे उपोषण नेमके कशासाठी होते हे जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचविले पाहिजे. संसद अधिवेशनादरम्यान एका दिवसांचा खर्च प्रचंड मोठा असतो. असा स्थितीत कामकाज चालूच न देणे लोकशाही व जनतेवर अन्याय करण्यासारखे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची एक जबाबदारी असते. मात्र कॉंग्रेसचे नेते अद्यापही सत्तेत असल्यासारखेच वागतात. केवळ आरोप लावायचे आणि चर्चेपासून दूर पळायचे, अशी त्यांची वृत्ती आहे. तर्काच्या आधारावर ते कुठलीही गोष्ट बोलतच नाही. देशात जातीधर्माच्या आधारावर विष पसरविण्याचे कारस्थान विरोधी पक्षांकडून सुरू आहे, अशी टीका यावेळी आ.अनिल सोले यांनी केली.
‘अॅट्रॉसिटी’ कायदा आवश्यकच
केंद्र सरकारने देशातील भ्रष्टाचार कमी करण्याचे काम केले आहे. प्रत्येक मुद्यावर सरकार चर्चेला तयार आहे. मात्र कॉंग्रेस व विरोधी पक्ष भीतीमुळे चर्चेपासून दूर पळत आहेत. ‘अॅट्रॉसिटी’ कायदा आवश्यकच असल्याची केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी केंद्राकडून करण्यातच येत आहे. केंद्र शासनाने वंचित, शोषित, पीडितांच्या उत्थानासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र तरीदेखील राजकारण मध्ये आणून या योजनांना विरोध होत आहे, असे मत यावेळी खा. डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केले.
असे चालले उपोषण
सकाळी १० च्या सुमारास संविधान चौक येथील उपोषण मंडपात डॉ. विकास महात्मे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार, नगरसेवक व विविध पदाधिकारीदेखील होते. त्यानंतर नेते व पदाधिकारी क्रमाक्रमाने येत होते तर अनेक जण डॉ. महात्मे यांच्या समवेत दिवसभर बसून होते. रणरणते ऊन असतानादेखील अनेक जण मंडपात एकाच जागी बसून होते. उपोषण परिसरात कोणताही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी काही खाणार नाही, यासंबंधात अगोदरच सूचना देण्यात आल्या होत्या व त्याचे कटाक्षाने पालन करण्यात आले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन डॉ.महात्मे यांनी उपोषण समाप्त केले. दरम्यान, दिवसभर कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात येत होत्या. उपोषण मंडपात महिला आघाडी अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा, माजी महापौर अर्चना डेहनकर, संदीप जाधव, महामंत्री किशोर पलांदूरकर, भोजराज डुम्बे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जमाल सिद्दीकी, सुभाष पारधी, निशा सावरक र, संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, चंदन गोस्वामी, प्रमोद पेंड़के, श्रीकांत देशपांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.