अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:35 AM2020-12-17T04:35:34+5:302020-12-17T04:35:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. परंतु विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही ‘ऑनलाईन’ अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांनीदेखील मागणी केली होती.
‘कोरोना’मुळे लांबलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त अखेर डिसेंबर महिन्यात निघाला. ‘कोरोना’ची एकूण स्थिती व हाती असलेला कमी वेळ लक्षात घेता विद्यापीठाने ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीभूत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमांमध्ये एलएलएम (मास्टर ऑफ लॉ), एमकॉम (प्रोफेशनल), एमएस्सी, एमसीटी (मास्टर ऑफ कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी), मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट व ‘एमआयआरपीएम’ (मास्टर ऑफ इंडस्ट्रिअल रिलेशन्स अॅन्ड पर्सनल मॅनेजमेन्ट) यांचा समावेश आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १२ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करायचे होते व २० डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार होती.
मात्र अनेकदा ‘सर्व्हर डाऊन’ होणे, मोबाईल अगोदरच ‘रजिस्टर’ झाला आहे, असे लिहून येणे असे विद्यार्थ्यांना संदेश आले. तर काही विद्यार्थ्यांच्या सहाव्या सत्राच्या गुणपत्रिका अवैध असल्याचे दाखविल्या गेले. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी व संघटनांकडून करण्यात आली. अखेर विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला.
पुढील वेळात्रपक कधी?
विद्यापीठाने प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली आहे. मात्र गुणवत्ता यादी जाहीर करणे, आक्षेप, पहिल्या फेरीतील पसंतिक्रम, दुसऱ्या फेरीतील पसंतिक्रम, प्रवेश इत्यादीसंदर्भातील सुधारित वेळापत्रक जारी केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून त्यासंदर्भात विचारणा करण्यात येत आहे.