वित्त व लेखा अधिकाऱ्यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:04+5:302021-06-29T04:07:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांना सहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांना सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांची मुदत संपत असताना नवीन भरतीसाठी प्रक्रिया सुरू झालेली नाही. अशास्थितीत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हिवसे यांनाच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. हिवसे हे कुलसचिव पदाच्यादेखील शर्यतीत असून, त्यांना मुदतवाढ दिल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जून २०१६ मध्ये डॉ. हिवसे यांची वित्त व लेखा अधिकारीपदी निवड झाली होती. जूनच्या अखेरच्या आठवड्यात त्यांची मुदत संपणार असल्यामुळे, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंदर्भातील मुद्दा मांडण्यात आला. नवीन भरतीसाठी अद्याप प्रक्रिया सुरू झाली नसून, पूर्णवेळ अधिकारी भेटायला विद्यापीठाला आणखी काही महिने लागू शकतात. यास्थितीत नवीन व्यक्तीला प्रभारी जबाबदारी दिल्यावर विद्यापीठाचा आर्थिक डोलारा समजून घेईपर्यंत वेळ लागू शकतो. त्यामुळे डॉ. हिवसे यांनाच मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. व्यवस्थापन परिषदेने या प्रस्तावाला मंजुरी दिली व त्यांना सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली. त्यांचे वेतन विद्यापीठाच्या सामान्य निधीतून करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
विद्यापीठ कायद्यानुसार फेरनियुक्ती शक्य नाही
नवीन भरतीसाठी लवकरात लवकर प्रक्रिया राबवावी लागणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार वित्त व लेखा अधिकारीपदी चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कॉस्ट अकाऊंटंट व्यक्तीची नेमणूक होणे अनिवार्य आहे. जर अशी व्यक्ती मिळाली नाही तर राज्य शासनाच्या वित्त व लेखा विभागातील अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पदावर फेरनियुक्ती शक्य नाही. अशास्थितीत डॉ. हिवसे यांची फेरनियुक्ती शक्य नसल्याने विद्यापीठाला नवीन चेहरा शोधावा लागणार आहे.