दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ
By आनंद डेकाटे | Published: January 12, 2024 06:57 PM2024-01-12T18:57:37+5:302024-01-12T18:57:56+5:30
नावनोंदणी अर्ज सादर करण्याची तारीख बुधवार १७ जानेवारी या कालावधीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी करिता खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज फॉर्म नं १७ अतिविलंब शुल्काने ऑनलाईन भरता येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे नागपूर विभागीय मंडळाचे सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे. इयत्ता १० वी व १२ वी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रतिदिन २० रूपये या प्रमाणे स्विकारण्यात येईल, तसेच नावनोंदणी अर्ज सादर करण्याची तारीख बुधवार १७ जानेवारी या कालावधीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://form१७.mh-ssc.ac.in बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form१७.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
पात्र विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे यांची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट,राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.