कार्यविस्तारासाठी बोलीभाषेच्या संवर्धनावर संघाचा राहणार भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:56 PM2018-03-09T13:56:22+5:302018-03-09T14:08:20+5:30
देशातील सर्वच भागांमध्ये कार्यविस्तार करण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असून यासाठी आता विविध प्रांतांमधील बोली-भाषेचीदेखील मदत घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सर्वच भागांमध्ये कार्यविस्तार करण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असून यासाठी आता विविध प्रांतांमधील बोली-भाषेचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. लुप्त होत चाललेल्या बोली भाषांच्या संवर्धनासाठी संघ पुढाकार घेणार असून यासंदर्भात देशपातळीवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. शुक्रवारपासून नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदीर परिसरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार झाली. या सभेत यासंदर्भातील प्रस्तावावर मंथन होणार आहे.
सभा सुरु होण्याअगोदर संघाचे सहसरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल यांनी पत्रपरिषदेत सभेबाबत माहिती दिली. यंदा सभेत केवळ एकच प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. गेल्या ३ वर्षांपासून संघ सामाजिक समरसतेवर कार्य करत आहे. त्याहून पुढे जात आता बोली-भाषा संवर्धनावर काम करण्यात येणार आहे. देशात वेगवेगळ््या बोलीभाषा प्रचलित आहेत. आदिवासी, दुर्गम भागातील तर अनेक बोली लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिकांकडूनदेखील या भाषांचा उपयोग कमी प्रमाणात होत आहे. परंतु या बोली व भाषांमध्ये आपल्या देशातील मोठी परंपरा व संस्कृती सामावलेली आहे. जर या भाषा टिकल्या तरच परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचेल. त्यामुळे या प्रस्तावावर सभेत चर्चा होणार आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यानंतर स्वयंसेवक समाजात जाऊन बोलीभाषेच्या संवर्ध़नासाठी कार्य करतील, असे डॉ.कृष्णगोपाल यांनी सांगितले. यावेळी मंचावर अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य व अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर उपस्थित होते.
प्रतिनिधी सभेत २५ महिला
संघाकडून महिलांना स्थान देण्यात येत नाही, अशी टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत महिलादेखील उपस्थित आहेत. या सभेत संघ परिवारातील ३५ संघटनांचे १ हजार ५३८ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात २४ महिलांचादेखील समावेश आहे. सभेदरम्यान विविघ संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडणार आहेत.
वर्षभरात संघशाखांत १८०० ने वाढ
मार्च २०१८ मध्ये संघाच्या देशभरात ३७, १९० स्थानांवर ५८ हजार ९६७ शाखा आहेत. मार्च २०१७ मध्ये हीच संख्या ५७ हजार १६५ इतकी होती. गेल्या वर्षभरात संघशाखांमध्ये १ हजार ८०२ ने वाढ झाली आहे. याशिवाय देशात १६ हजार ४०५ ठिकाणी संघाचे साप्ताहिक मिलन व ७ हजार ९७९ ठिकाणी संघ मंडळी चालतात.
नाशिक शेतकऱ्यांचा मोर्चा हा राजकीय मुद्दा
यावेळी डॉ.कृष्णगोपाल यांना नाशिकच्या शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर काढलेल्या मोर्चासंदर्भात विचारणा करण्यात आली. नाशिक येथील शेतकऱ्यांचा मोर्चा हा राजकीय मुद्दा आहे. परंतु शेतकरी समृद्ध झाले पाहिजेत व विचारांनी मजबूत झाले पाहिजेत, ही संघाची भूमिका आहे. त्यादृष्टीने कार्यदेखील सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.