वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणासाठी करावा लागणार व्यापक विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:40 PM2020-10-10T23:40:25+5:302020-10-10T23:41:26+5:30
Artificial migration, tigers, Nagpur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वाढलेल्या वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणावरून सध्या वनविभागात हालचाली सुरू आहेत. मात्र या संदर्भात घाई गडबडीत निर्णय न होता अभ्यासपूर्वक आणि व्यापक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वाढलेल्या वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणावरून सध्या वनविभागात हालचाली सुरू आहेत. मात्र या संदर्भात घाई गडबडीत निर्णय न होता अभ्यासपूर्वक आणि व्यापक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून वनमंत्र्यांनी वाघांच्यास्थलांतरणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला आहे. डिसेंबरअखेर त्याचा अहवाल मागविण्यात आला आहे. राज्यात वाघांसदर्भात अनेक विषय अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. वाघांच्या स्थलांतरणाच्या अभ्यासासाठी समितीला हा अडीच महिन्याचा काळ अपुरा पडणार आहे. यामुळे आतापासूनच या विषयावरून क्रिया-प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनसोबतच बफर झोनमध्येही वाघांची संख्या वाढली आहे. ही संख्या आता २५० च्या वर असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवास कमी पडायला लागल्याने येथील वाघ नव्या अधिवासाच्या शोधात आहेत. या काळात वाढलेल्या वन्यजीव संघर्षांच्या घटनांमुळे येथील वाघांचे स्थानांतरण करण्याची मागणी व्हायला लागली.
प्रत्यक्षात वाघांचे कृत्रिम स्थलांंतरण ही निसर्गनियमाविरूद्धची प्रक्रिया आहे. त्यामळे अनेकांकडून यासंदर्भात आतापासूनच नाराजीचा सूर उमटायला लागला आहे. हे कृत्रिम स्थलांतरण निसर्गनियमासोबत सुसंगत कसे ठरू शकते, असा मुद्दा आता उपस्थित होत आहे. वाघांचा भ्रमणमार्ग मोठा असल्याने ते हजार किलोमीटरच्या वर फिरतात. मात्र अधिवास निवडताना पसंतीचा निवडतात. स्थलांतरणामध्ये वाघांची स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची मानसिकता कशी तपासणार, असा मुद्दा आता पुढे येत आहे. येथील वाघांना अन्य क्षेत्रामध्ये स्थलांतरित केल्यावर तेथील समस्या वाढण्याची शक्यता आहे. या वाघांना महाराष्ट्रातच स्थलांतरित करणार की अन्य राज्यांचे जंगल निवडणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
वाघांच्या स्थलांतरणाचा हा प्रयोग नवा नसून यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात बिबटांचे स्थलांतरण करण्याचा प्रयोग झाला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. मध्य प्रदेशात आणि राजस्थानातील सारिस्कामध्येही असा प्रयोग झाला. मात्र त्याला यात यश आले नाही. आता ताडोबातील वाघांच्या बाबतीही असा प्रयोग होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने यापूर्वीचे प्रयत्न तपासावे, अशी अपेक्षा व्याघ्रप्रेमींकडून व्यक्त होत आहे.