तडीपार गुडांचा उपराजधानीतच डेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:42 AM2018-08-22T00:42:29+5:302018-08-22T00:43:26+5:30
नागपूर शहरच नव्हे तर पुन्हा जिल्ह्यातही पाय ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद देऊन हद्दपार केल्यानंतरही अनेक तडीपार गुंड नागपुरातच राहत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ते लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी अशा गुंडांना हुडकून काढण्याचे आदेश दिले. परिणामी गुन्हे शाखेने सोमवारी रात्री विशेष शोधमोहिम राबवून एकाच रात्रीत आठ तडीपार गुंडांना जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरच नव्हे तर पुन्हा जिल्ह्यातही पाय ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद देऊन हद्दपार केल्यानंतरही अनेक तडीपार गुंड नागपुरातच राहत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. ते लक्षात घेत पोलीस आयुक्त डॉ. बी. के. उपाध्याय यांनी अशा गुंडांना हुडकून काढण्याचे आदेश दिले. परिणामी गुन्हे शाखेने सोमवारी रात्री विशेष शोधमोहिम राबवून एकाच रात्रीत आठ तडीपार गुंडांना जेरबंद केले.
वारंवार गुन्हे दाखल करून आणि वारंवार कारवाई करूनही गुन्हेगारांच्या वृत्तीत फरक पडत नसल्यामुळे अशा सराईत गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात येते. वर्र्षभरात असे अनेक गुन्हेगार हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना नागपूर शहराबाहेर नेऊन सोडल्यानंतर संबंधित पोलीस त्यांना तडीपारीच्या कालावधीत पुन्हा नागपूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही पाय ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद देतात. मात्र, अनेक गुन्हेगार लगेच नागपुरातच परतात. ते येथे राहतात अन् गुन्हेगारीही करतात. गुन्हेगारीत सक्रिय असलेले अनेक तडीपार गुंड पोलिसांना वेळोवेळी सापडतात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तडीपार गुंडांना हुडकून कोठडीत डांबण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक आयुक्त संजीव कांबळे यांनी शहरातील गुन्हेशाखेच्या पाचही पथकांना सोमवारी रात्री तडीपार गुंडांना हुडकून काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, राबविण्यात आलेल्या मोहिमेत कुख्यात गुंड प्रवीण लक्ष्मीकांत घाटे, शब्बीर खान बशिर खान, संघरत्न ऊर्फ शंकर मिलिंद भोयर, भोला ऊर्फ इरफान खान, वाट्या ऊर्फ सूरज टिकाराम धापोडकर, शुभम देवकीनंदन बिरहा. राजा ऊर्फ राजेश वसंतराव ठाकरे, छोटू ऊर्फ राकेश महादेव रामटेके या आठ गुन्हेगारांना विविध वस्त्यांमध्ये पकडले. त्यांना आज कोठडीत डांबण्यात आले आहे.