देशभरातील जंगलांना घातक लॅन्टेनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 11:29 AM2021-08-18T11:29:35+5:302021-08-18T11:31:51+5:30
Nagpur News केवळ विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील जंगलाला लॅन्टेना (घाणेरी) या वनस्पतीचा विळखा पडला आहे. देशभरातील ४० टक्के जंगल या वनस्पतीच्या विळख्यात आले आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील जंगलाला लॅन्टेना (घाणेरी) या वनस्पतीचा विळखा पडला आहे. देशभरातील ४० टक्के जंगल या वनस्पतीच्या विळख्यात आले आहे. दिवसेंदिवस या वनस्पतीची वाढ होत असली तरी फक्त वन्यजीव अधिवास व्यवस्थापनात या वनस्पतीच्या निर्मूलनाचा समावेश करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेतून निर्मूलनास नकार दिल्याने सध्या अन्य जंगलात लॅन्टेना निर्मूलनाचे काम थांबले आहे.
१९७२ मध्ये देशात दुष्काळ पडला असताना मिलो गव्हासोबत ही वनस्पतीही अमेरिकेतून भारतात आल्याचे सांगितले जाते. मागील ५० वर्षांत अनेक विदेशी निरुपयोगी वनस्पतीसोबतच लॅन्टेनाचीही घुसखोरी जंगलात झाली आहे. ती भारतीय जंगलाला हानीकारक असून, पहिल्या पाचमध्ये गणली जाते. लॅन्टेनाच्या निर्मूलनासाठी १९९५-९६ मध्ये प्रयत्नांना सुरुवात झाली. राज्य शासनाने जीआर काढून रोजगार हमीत समावेश केला. नंतरच्या काळात ही योजना बंद पडून ‘नरेगा’ योजना आली. त्यातही समावेश केला गेला. मात्र पुढे केंद्र सरकारने अन्न चळवळ नसल्याचे कारण देत लॅन्टेना निर्मूलन राबविण्यासाठी नकार दिला. नंतर २००४ पासून हे कामच बंद पडले. परिणामत: या विषारी वनस्पतीचा विळखा वाढला.
वन्यजिवांच्या अधिवासातच निर्मूलन
डॉ. सी. आर. बाबू यांच्या उपस्थितीत मेळघाट येथे कार्यशाळा घेण्यात आली. यात लॅन्टेना निर्मूलनावर अभ्यास करण्यात आला. ही वनस्पती वाघांसाठी धोकादायक असून, त्यांचे यकृत निकामी होते, असे अध्ययनातून पुढे आले. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात किमान तीन वर्षे सतत उच्चाटन करून त्या ठिकाणी तृणभक्षी प्राण्यांसाठी उंच गवताची लागवड करण्याची योजना मांडली गेली. त्यानंतर वन्यजिवांच्या अधिवास व्यवस्थापनात समावेश करण्यात आला.
एकाच वेळी सर्व ठिकाणी निर्मूलनाचा धडक कार्यक्रम राबविला तरच उच्चाटन शक्य आहे. यासंदर्भात आपण स्वत: केंद्राकडे विनंती केली. एनआरईजीएसमध्ये समावेश व्हावा, यासाठीही प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. आता शहरापर्यंत ही वनस्पती पसरल्याने जैवविविधतेला धोका वाढला आहे.
- किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
लॅन्टेना ४० टक्के जंगलात
लॅन्टेना सुमारे ४० टक्के जंगलात पसरली आहे. ती मातीतील पौष्टिक घटक नाहीसे करते. प्राण्यांच्या पोटात ही वनस्पती गेल्यास यकृत निकामी करते. मानवी शरीरालाही अपायकारक असल्याचे ‘ग्लोबल इकॉलॉजी अँड कन्झर्वेशन’च्या अभ्यासातून पुढे आले आहे. या वनस्पतीने सुमारे एक लाख ५४ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे.