व्यापाऱ्याकडून जबरदस्ती वसुली; तीन तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: March 17, 2023 07:19 PM2023-03-17T19:19:31+5:302023-03-17T19:20:03+5:30
Nagpur News व्यापाऱ्याकडून जबरदस्ती वसुली करणाऱ्या तीन तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : तृतीयपंथीयांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम उघडली असली तरी त्यांच्यावर पूर्णत: नियंत्रण आलेले नाही. विशेषत: बाजारपेठांमध्ये तृतीयपंथीयांकडून जबरदस्तीने पैसे मागणे सुरूच आहे. व्यापाऱ्याकडून जबरदस्ती वसुली करणाऱ्या तीन तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आर्जव प्रशांत डोणगावकर (२६, लाडपुरा) यांचे इतवारीतील किराणा ओळीत दुकान आहे. १६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास जिया, जोजो आणि ललिता हे तीन तृतीयपंथी तेथे आले व त्यांनी डोणगावकर यांना ५० रुपयांची मागणी केली असता, डोणगावकर यांनी त्यांना २० रुपये दिले. मात्र, तृतीयपंथीयांनी आणखी पैशाची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर तुमचे वाईट होईल, असेदेखील ते म्हणाले व डोणगावकर यांच्याकडून आणखी तीस रुपये घेऊन गेले. डोणगावकर यांना पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या निर्देशांची तसेच सुरू असलेल्या कारवायांची माहिती होती. त्यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिन्ही तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.