वीज ग्राहकांवर अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा बोजा!
By Admin | Published: May 7, 2014 03:01 AM2014-05-07T03:01:45+5:302014-05-07T03:01:45+5:30
वीज ग्राहक अगोदरच वीज दरवाढीमुळे त्रस्त झाला असताना, महावितरणने आता अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा पुन्हा बोजा लादला आहे.
ग्राहकांचे बजेट बिघडले : एकाच महिन्यात दोन बिल
नागपूर : वीज ग्राहक अगोदरच वीज दरवाढीमुळे त्रस्त झाला असताना, महावितरणने आता अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा पुन्हा बोजा लादला आहे. महावितरणने या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली वीज ग्राहकांना या महिन्याला दोन बिल पाठविले आहेत. यात एक एप्रिल महिन्याचे बिल असून, त्यासोबतच दुसरे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल देण्यात आले आहे. त्यानुसार वीज ग्राहकांना या महिन्याला दोन बिले भरावी लागणार आहे.
महावितरणच्या मते, राज्य वीज नियामक आयोगाने गत २00५ मध्ये जारी केलेले परिपत्रक व भारतीय वीज कायदा २00३ च्या कलम ४७ अन्वये सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. ती सुरक्षा ठेव आर्थिक वर्षातील कोणत्याही एका महिन्याच्या सरासरी वीज बिलाइतकी असेल. याशिवाय वीज वितरण कंपनी वर्षातून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने त्याचे पुनर्निर्धारण करू शकते.
एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी बिलापेक्षा कमी असेल, तर संबंधित ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. शिवाय वीज ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीज दर आणि वीज वापर यामुळे वीज बिलांची रक्कम वाढली आहे. त्यामुळे त्यातील फरकाच्या रकमेचे बिल म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल जमा करणे बंधनकारक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे आयोगाने वीज ग्राहकांकडून जमा करण्यात येणार्या या सुरक्षा ठेवींवर कालावधीनुसार ९.५ टक्क्यापर्यंत व्याज देण्याचे निर्देश दिले आहेत.
परंतु या निर्देशांचे महावितरण किती पालन करणार आणि किती ग्राहकांना व्याजाची रक्कम परत मिळणार, हे महावितरणलाच माहीत. (प्रतिनिधी)