तर नागपूर शहरासाठी कन्हानमधून अतिरिक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 08:19 PM2018-11-19T20:19:03+5:302018-11-19T20:22:40+5:30
अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आहे. आरक्षित कोट्यावरील भार कमी करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातून अधिक क्षमतेने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपुरा पाऊस आणि पेंच जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे उपलब्ध जलसाठ्यानुसार नागपूर शहरासाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. पाणी आरक्षणात करण्यात आलेली कपात विचारात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य उपाययोजना राबविण्याला सुरुवात केली आहे. आरक्षित कोट्यावरील भार कमी करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण कें द्रातून अधिक क्षमतेने पाणी उपसण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.
कन्हान जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दररोज २५० एमएलडी आहे. परंतु पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जात नाही. सध्या येथून १९० एमएलडी पाणी उचलले जाते. केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येत आहे. यासाठी नवीन पाईपलाईनची जोडणी केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे यांनी दिली. संभाव्य जलसंकट लक्षात घेता पिण्याचा पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करा, सोबतच नवीन जलस्रोत निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले होते. त्यानुसार जलप्रदाय विभाग कामाला लागला आहे. पाणी बचतीसोबतच बोअरवेल, सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पेंच प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन धरणांमध्ये महापालिकेसाठी दरवर्षी १९० दलघमी पाण्याचे आरक्षण ठेवले जात होते. परंतु यावर्षी धरणात केवळ २८३.६६८ दश लक्ष घन मीटर म्हणजे २२.४८ टक्के साठा उपलब्ध असल्याने महापालिकेचे आरक्षण १५५ दलघमी करण्यात आले आहे.
नागपूर शहरासाठी पेंच जलाशयातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा बघता कन्हानमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था करणे तसेच कन्हान-कोलार नदीवर प्रकल्प बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पर्याय म्हणून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
सार्वजनिक ५४३ विहिरींचा वापर करणार
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई विचारात घेता शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. शहरात ७८४ सार्वजनिक विहिरी आहेत. यातील ५४३ वापरण्यायोग्य आहेत. यातील ४२५ विहिरींची स्वच्छता करण्याचे प्रस्ताव आले होते. यातील ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली आहे. १०१ विहिरींवर मोटरपंप लावण्याचे प्रस्ताव आले होते. यातील ५२ विहिरीवल पंप लावण्यात आले. उर्वरित विहिरीवर लवकरच पंप बविण्यात येणार आहेत.
३४७ बोअरवेल खोदण्याचे प्रस्तावित
गेल्या वर्षी नागपूर शहरासाठी ९ कोटी ४२ लाखांचा पाणीटंचाई कृ ती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ३४७ विंधन विहिरी(बोअरवेल) प्रस्तावित होत्या. मात्र हा प्रस्ताव कार्यान्वित झाला नव्हता. यावर्षी परिस्थिती बिकट असल्याने या बोअरवेलची कामे हाती घेतली जाणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. शासनाकडून यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे.