नागपूर जिल्हा न्यायालयातील झाडांची बेमुर्वत छाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 09:24 PM2020-02-21T21:24:40+5:302020-02-21T21:25:59+5:30
जिल्हा व सत्र न्यायालयातील झाडांची शुक्रवारी बेमुर्वतपणे छाटणी करण्यात आली. झाडांच्या सर्व फांद्या कापून केवळ धड कायम ठेवण्यात आले. ही बाब वकिलांनी गंभीरतेने घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयातील झाडांची शुक्रवारी बेमुर्वतपणे छाटणी करण्यात आली. झाडांच्या सर्व फांद्या कापून केवळ धड कायम ठेवण्यात आले. ही बाब वकिलांनी गंभीरतेने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.
जिल्हा विधिज्ञ संघटनेचे महासचिव नितीन देशमुख यांनी अग्निशमन सुविधेसाठी झाडांची छाटणी केली गेली असावी असे सांगितले. आग लागल्यास पाण्याच्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा मोकळी रहावी व अन्य आवश्यक हालचाली करणे सोपे जावे याकरिता झाडांची छाटणी करणे आवश्यक असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकाऱ्यांनी म्हटले होते अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात वृक्ष संवर्धनासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यात हा मुद्दा मांडला जाऊ शकतो. अॅड. पंकज चौबे यांनी झाडांची छाटणी करताना काळजी घेण्यात आली नाही असे सांगितले. झाडांची छाटणी करणे म्हणजे पूर्ण फांद्या तोडून टाकणे नव्हे असे मतही त्यांनी व्यक्त केले.