टोल नाक्यावर चालकांची नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:09 AM2021-02-07T04:09:12+5:302021-02-07T04:09:12+5:30
नागपूर : नॅशनल हाय वे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय)च्या वतीने काही दिवस नागपूर-छिंदवाडा हायवेवर पाटनसावंगी टोल नाक्यावर नि:शुल्क नेत्र ...
नागपूर : नॅशनल हाय वे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय)च्या वतीने काही दिवस नागपूर-छिंदवाडा हायवेवर पाटनसावंगी टोल नाक्यावर नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात २०० वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. शिबिरात गरजेनुसार १०० वाहन चालकांना चष्मे वितरित करण्यात आले.
रस्ता सुरक्षा महिन्यांतर्गत या शिबिराचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. बहुतांश अपघाताच्या प्रकरणात चालकांची जवळची नजर कमकुवत असणे हे प्रमुख कारण असते. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात एनएचएआयचे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल, महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार, प्रकल्प संचालक अभिजीत जिचकार, प्रशांत पग्रुट, मिलिंद केदार, कंत्राटदार कंपनीचे प्रभारी विकास सिंह उपस्थित होते. नागपूर व सावनेरचे नेत्रतज्ज्ञांनी वाहन चालकांच्या डोळ्यांची तपासणी केली.
..........
रस्ता सुरक्षिततेवर कार्यशाळा
‘अनेकदा आपली दृष्टी कमकुवत झाल्याची माहिती वाहन चालकांना नसते. चालकांमध्ये नेत्र तपासणीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. इतर टोल नाक्यांवर अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले. या सोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. टोल प्लाझावर रस्ता सुरक्षेसंबंधी माहितीपत्रक वाटण्यात येत आहेत. नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करण्यात येत आहे. आगामी १४ फेब्रुवारीला शहरात एका स्वयंसेवी संस्था आणि रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिक, युवक, अभियंता यात सहभागी होणार आहेत. यावेळी रस्ता सुरक्षेबाबत एक माहितीपट दाखविण्यात येईल.’
राजीव अग्रवाल, प्रादेशिक अधिकारी, एनएचएआय, नागपूर
.............