नागपुरात निवासी भागातील जमिनीवर हॉस्पिटल उभारणाऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:42 AM2020-10-20T11:42:18+5:302020-10-20T11:43:52+5:30

Nagpur News Hospitals काँग्रेस नगर, वर्धा रोड, सेंट्रल बाजार रोड आदी परिसरावर हॉस्पिटल सुरू करणाऱ्यांची नजर आहे. हॉस्टिपलसाठी संबंधित भागात जमिनीची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. याला वेळीच आवर न घातल्यास नागरिकांना परिसरातून फिरणेही कठीण होईल.

Eye of hospital builders on residential land in Nagpur | नागपुरात निवासी भागातील जमिनीवर हॉस्पिटल उभारणाऱ्यांची नजर

नागपुरात निवासी भागातील जमिनीवर हॉस्पिटल उभारणाऱ्यांची नजर

Next
ठळक मुद्देशहरातील खासगी हॉस्पिटल -६५० धंतोली, रामदासपेठ -३००-३२५ खासगी लॅब- ५० ते ६० रुग्ण व नातेवाईकांची गर्दी- १५ ते २० हजारधंतोली, रामदासपेठ लगतच्या भागात खरेदी-विक्री वाढली

राजीव सिंह/ गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील ५०टक्के खासगी हॉस्पिटल धंतोली व रामदासपेठ परिसरात आहेत. परंतु हा निवासी भाग असल्याने येथे हजारोंच्या संख्येने येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पार्किंग, जैविक कचरा यासह अन्य मुद्यावरून प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले. मनपा सभागृहातही संबंधित भागात नवीन हॉस्पिटलला मंजुरी न देण्यावर सहमती झाली. परंतु आता या परिसरालगतच्या काँग्रेस नगर, वर्धा रोड, सेंट्रल बाजार रोड आदी परिसरावर हॉस्पिटल सुरू करणाऱ्यांची नजर आहे. हॉस्टिपलसाठी संबंधित भागात जमिनीची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. याला वेळीच आवर न घातल्यास नागरिकांना परिसरातून फिरणेही कठीण होईल.

नागपूर शहरात लहान मोठे सुमारे ६५० खासगी रुग्णालये आहेत. यातील जवळपास ३०० हॉस्पिटल, क्लिनिक, नर्सिंग होम रामदासपेठ परिसरात आहेत. आता या परिसरात नवीन हॉस्पिटलला परवानगी देण्याला बंदी घातली आहे. या परिसरात ५०ते ६०लॅब आहेत. येथे सर्व प्रकारची तपासणी केली जाते. कोविड काळात तर काही खासगी लॅबमध्ये लांब रांगा लागत होत्या. या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. यातून संक्रमण पसरण्याचा कायम धोका असतो.
सूत्रांच्या माहितीनुसार धंतोली, रामदासपेठ लगतचा भाग, वर्धा रोडवर हॉस्पिटल उभारण्याची इच्छा असलेल्यांनी अर्धा डझनहून अधिक मोठ्या जमिनीचे व्यवहार केले आहेत. यामुळे भविष्यात या भागात निश्चितच हॉस्पिटलची संख्या वाढणार आहे.

नियम काय म्हणतात
मनपाच्या नगररचना विभागाच्या कायद्यानुसार १५ मीटर रुंदीच्या रोडवर हॉस्पिटल उभारण्याला परवानगी दिली जाते. ९ मीटरचा रस्ता, जुने प्लॉटवर नर्सिंग, रुग्णालये, सुरू करू शकतात. वर्धा रोड २० मीटर रुंदीचा आहे. अशा परिस्थितीत या मार्गावर हॉस्पिटल उभारणाऱ्यांत जमीन खरेदीसाठी स्पर्धा सुरू आहे. संबंधित भागातील नागरिकांसाठी ही बाब निश्चितच चिंताजक आहे.

ऑरेंज सिटी स्ट्रीटचा पर्याय
मनपाचा ऑरेंज सिटी स्ट्रीट आर्थिक तंगीमुळे रखडला आहे. या स्ट्रीटवर डॉक्टरांसाठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु बहुसंख्य डॉक्टर धंतोली, रामदासपेठ परिसर सोडण्याला तयार नाही. वास्तविक संबंधित भागात आता हॉस्पिटलची अजिबात गरज नाही. नागिरकांना होणारा त्रास विचारात घेता संबंधित भागाच्या एक किलोमीटर परिसरात कोणत्याही नवीन हॉस्पिटलला मंजुरी देता कामा नये.

कोणताही अर्ज आलेला नाही : गावंडे
धंतोली, रामदासपेठ भागात हॉस्पिटलला मंजुरी दिली जात नाही. या लगतच्या भागात नवीन हॉस्पिटलला डीसीआर अंतर्गत मंजुरी दिली जाऊ शकते. परंतु धंतोली, रामदासपेठ लगतच्या भागात नवीन हॉस्पिटल उभारण्यासाठी मंजुरीकरिता तूर्त कोणत्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही. वर्धा रोडवरील काही अर्ज आले आहेत. नियमानुसार मंजुरी दिली जाईल. अशी माहिती मनपाच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांनी दिली.
 

Web Title: Eye of hospital builders on residential land in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.