जळगाव आयुर्वेद कॉलेजसाठी नागपूरच्या शिक्षकांवर डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 08:13 PM2019-08-05T20:13:32+5:302019-08-05T20:15:16+5:30
जळगाव येथे पाचव्या आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. या वर्षीपासून १०० ‘बीएएमएस’ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, या महाविद्यालयासाठी मान्यता देण्यात आलेली ३५० पदे अद्यापही भरली नाहीत. परिणामी, नागपूरसह उस्मानाबाद, नांदेड व मुंबईच्या कॉलेजमधून प्रतिनियुक्तीवर (उसणवारी) पदे भरली जाणार आहे, असे झाल्यास नागपूर आयुर्वेद महाविद्यालय अडचणीत येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जळगाव येथे पाचव्या आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. या वर्षीपासून १०० ‘बीएएमएस’ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, या महाविद्यालयासाठी मान्यता देण्यात आलेली ३५० पदे अद्यापही भरली नाहीत. परिणामी, नागपूरसह उस्मानाबाद, नांदेड व मुंबईच्या कॉलेजमधून प्रतिनियुक्तीवर (उसणवारी) पदे भरली जाणार आहे, असे झाल्यास नागपूर आयुर्वेद महाविद्यालय अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राज्यात नागपूर, नांदेड, उस्मानाबाद व मुंबई या चार ठिकाणीच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालये आहेत.
आयुर्वेदाचे वाढते महत्त्व व लोकांचा आयुर्वेद उपचाराकडे वाढता कल पाहता केंद्र शासनाने जळगावच्या आयुर्वेद महाविद्यालयाला १ ऑगस्ट २०१९ रोजी मंजुरी दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार १०० एवढी राहणार आहे. यावर्षीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सूत्रानुसार, मे २०१७ मध्ये शासनाने या महाविद्यालयासाठी ३५० पदांना मंजुरी दिली. मात्र, अद्याप शासनाने पदभरती केली नाही. यामुळे नागपूर, उस्मानाबाद, नांदेड व मुंबईच्या कॉलेजमधून प्रतिनियुक्तीवर पदे भरली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नागपुरातील आयुर्वेद महाविद्यालयात एकूण ६४ अध्यापकांच्या जागा मंजूर आहेत. यातील ११ जागा रिक्त आहेत. महाविद्यालयात ‘पीजी’च्या ६० वरून ८४ जागांवर प्रवेश देण्याच्या प्रयत्नात आहे. या जागांसाठी ७५ अध्यापकांची गरज आहे. यातच ऑगस्ट २०१९ मध्ये तीन अध्यापक निवृत्त होणार आहे. यामुळे येथील शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर पाठविल्यास महाविद्यालय अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.