सैराट सुटली फेसबुक ‘लव्ह एक्स्प्रेस’; पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 08:00 AM2022-07-09T08:00:00+5:302022-07-09T08:00:11+5:30

Nagpur News सैराट सुटलेल्या दोन अल्पवयीन प्रेमवीराना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Facebook ‘Love Express’; Police took him into custody | सैराट सुटली फेसबुक ‘लव्ह एक्स्प्रेस’; पोलिसांनी घेतले ताब्यात

सैराट सुटली फेसबुक ‘लव्ह एक्स्प्रेस’; पोलिसांनी घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्देहावडा-नरखेड टू छपरा - घागरा-गंगा नदीच्या संगमावर सापडले प्रेमीयुगुल

नरेश डोंगरे

नागपूर : कल्पनांचे पंख लावून फेसबुकच्या दुनियेची सफर करणारे दोन अल्पवयीन जीव एकमेकांच्या संपर्कात आले. ती नरखेडजवळची, तो हावडा (पश्चिम बंगाल)मधील. भाषा, प्रांत, अडचणी या साऱ्या साऱ्या गोष्टींना झुगारणाऱ्या या दोघांचे फेसबुकवरच प्रेम बहरत गेले. कधी एक-दुसऱ्याला भेटतो, अशी त्यांची अवस्था झाली अन् तो प्रांतांच्या सीमा ओलांडत गेल्या आठवड्यात तिच्याकडे आला. तिला सोबत घेतले अन् येथून दुसऱ्या प्रांतात निघूनही गेला. बोभाटा झाला, तक्रार झाली अन् पोलीस सरसावले. अखेर सात दिवसांनंतर पोलिसांनी या अल्पवयीन प्रेमीयुगुलाला बिहारमधील घागरा-गंगा नदीच्या संगमावर शोधून काढले.

रिल (पडद्यावरची) वाटावी अशी ही रिअल स्टोरी नागपूर जिल्ह्यातील आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय महाराष्ट्र-मध्य प्रदेशमधील रहिवासी असून, रोजगाराच्या शोधात ते नरखेडजवळच्या एका खेडेगावात स्थिरावले. आई-वडील उदरभरणाची व्यवस्था करण्यासाठी बाहेर काबाडकष्ट करत होते अन् अल्पवयीन युवती (वय १७) घरात बसून मोबाईलवर कधी ऑनलाईन गेम तर कधी फेसबुक जगताची सफर करत होती. फेसबुकच्या विश्वात फिरताना ती एक दिवस हावडा येथील एका युवकाच्या संपर्कात आली. फ्रेण्ड रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतर त्यांच्यात ऑनलाईन संवाद रंगत गेला. ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. आता त्यांना एक-दुसऱ्याचा विरह कासावीस करू लागला. ‘ये दुरिया... ये फांसले... मिटविण्याचा इराद्याने तो गेल्या आठवड्यात नरखेडला पोहोचला. काही दिवस तेथे मुक्काम ठोकल्यानंतर ‘जिना मरना संग संग’चा संकल्प करून हे दोघे अंबाड्यातून बाहेर पडले. त्यांची सुसाट ‘लव्ह एक्स्प्रेस’ थेट बिहारमध्ये पोहोचली. इकडे युवतीला पळवून नेल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल झाली. आरोपी अनोळखी अन् परप्रांतीय असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्र फिरवली. ---

छपऱ्यात घुटमळले प्रेमीयुगुल

मुलीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स, रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेला तपासाचा मार्ग प्रशस्त करत नरखेडचे पोलीस निरीक्षक जयपाल गिरासे यांनी तपासासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्यातून ‘लव्ह एक्स्प्रेस’ घागरा-गंगा नदीचे संगम असलेल्या बिहारमधील छपरा येथे घुटमळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे छपरा पोलिसांना ही माहिती देऊन प्रेमीयुगुलाला ताब्यात घेण्याची विनंती केली.

पोलिसांचा तंत्रशुद्ध तपास

छपरा पोलिसांनी त्या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतल्याची माहिती गुरुवारी नरखेड पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक लगेच छपराकडे रवाना झाले. मुलगी अन् तिला पळवून नेणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, हे पथक शनिवारी नागपुरात पोहोचण्याची अपेक्षा आहे. या घडामोडींमुळे आता या प्रेमीयुगुलाने केलेल्या आभासी जगताच्या सफरीला तात्पुरता ‘ब्रेक’ लागणार आहे. कल्पनेचे पंख लावून उडताना कोणता गंभीर गुन्हा केला, त्याचीही जाणीव या प्रकरणातील आरोपी ठरलेल्या हावड्याच्या युवकाला नक्कीच होणार आहे.

----

Web Title: Facebook ‘Love Express’; Police took him into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.