फेसबुक वापरणाऱ्यांनो सावधान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:02+5:302021-06-05T04:07:02+5:30
अरुण महाजन लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : बहुतांश माणसं साेशल मीडियावर सक्रिय असतात. माहिती, संदेश व विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी ...
अरुण महाजन
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : बहुतांश माणसं साेशल मीडियावर सक्रिय असतात. माहिती, संदेश व विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या साेशल मीडियाचा वापर फसवणूक करण्यासाठीही केला जात आहे. हल्ली फेसबुकवर बनावट आयडी तयार करून त्या आयडीद्वारे व्हिडिओ कॉलिंग करणे व त्यातून अश्लील चित्रफीत तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देत रकमेची मागणी केल्याचा प्रकार खापरखेडा (ता. सावनेर) येथे नुकताच घडला. पाेलिसांनी सदर प्रकरण तपासात घेतले आहे.
खापरखेडा येथील ४५ वर्षीय व्यक्ती विवाहित असून, कुटुंबीयांसह राहताे. त्या व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटवर ३० मे राेजी एका तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. त्यानंतर दाेघांचे चॅट सुरू झाले. त्यातच तरुणीने अश्लील भाषेत चॅट सुरू करीत स्वतःचा मोबाईल नंबर दिला व त्यांचाही नंबर मिळवून घेतला. पुढे फेसबुक आणि व्हाॅट्सॲप व्हिडिओ कॉलिंग करून तरुणीने त्यांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. हा प्रकार येथेच न थांबता त्या मुलीने चॅटचा स्क्रीन शॉट काढून तसेच अश्लील चित्रफीत त्यांच्या व्हाॅट्सॲपवरही पाठवली.
त्या तरुणीने २० हजार रुपयांची मागणी करीत अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्या विवाहित व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार खापरखेडा येथील लाेकमत प्रतिनिधीला सांगितला. दाेघांनीही पाेलीस ठाणे गाठून पाेलिसात तक्रार नाेंदविली. खापरखेडा पाेलिसांसाेबतच स्थानिक गुन्हे शाखेनेही या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.
...
ताे आवाज पुरुषाचा
ज्या माेबाईल क्रमांकावर (७३८१७२३५१९) ती तरुणी त्यांच्याशी चॅटिंग करीत हाेती, त्याच क्रमांकावरून साेमवारी (दि. ३१) त्या व्यक्तीला पहिल्यांदा फाेन आला. फाेनवरील आवाज तरुणीचा नसून, तरुणाचा हाेता. त्या तरुणाने २० हजार रुपये लगेच पेटीएम, गुगल पे किंवा फोन पेद्वारे त्याच्या खात्यात जमा करण्यास बजावले. ती रक्कम ठरलेल्या अवधीत न मिळाल्याने आक्षेपार्ह चित्रफीत व चॅट त्या व्यक्तीच्या परिचयातील काही लाेकांनाही मॅसेंजरवर पाेस्ट केला. त्याचे स्क्रीन शाॅट काढून अतिरिक्त रकमेची मागणी करण्यात आली.
...
ग्रामीण भागातही लाेण
फसवणुकीचे असे प्रकार पूर्वी शहरात घडायचे. मागील दाेन महिन्यात नागपूर शहरात असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. मात्र, फसवणूक करणाऱ्यांनी शहरातील माेठ्या व्यक्तींसाेबतच आता ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तींनाही टार्गेट करायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारे फसवणूक करून पैसे उकळण्याचा खापरखेडा येथील काही प्रकार नागपूर ग्रामीणमधील पहिलाच आहे. साेशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या व्यक्तींची अशाप्रकारे फसवणूक हाेण्याची शक्यता बळावल्याने सर्वांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.