एम्समध्ये आता लिंग बदलासारख्या सुविधाही उपलब्ध होणार
By सुमेध वाघमार | Published: June 7, 2024 06:17 PM2024-06-07T18:17:55+5:302024-06-07T18:19:18+5:30
तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार : मध्य भारतातील पहिले शासकीय केंद्र
सुमेध वाघमारे
नागपूर : तृतीयपंथीयांवरील उपचाराची सोय केवळ दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) होती. परंतु आता नागपूर ‘एम्स’मध्येही तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे मध्य भारतातील पहिले शासकीय रुग्णालय ठरले आहे. विशेष म्हणजे, येथे लिंग बदलासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही उपलब्ध असणार आहे.
सध्या शासकीय रुग्णालयात तृतीयपंथीयांवर सामान्यांसोबतच उपचार होतात. परिणामी, अनेक तृतीयपंथीय रुग्ण उपचार टाळतात. कालांतराने त्यांची प्रकृती गंभीर होते. दिल्लीच्या धर्तीवर नागपूर ‘एम्स’मध्येही ‘ट्रान्सजेंडर क्लिनिक’ स्थापन करण्यासाठी मिशन विश्व ममत्व फाऊंडेशन या सामाजिक संघटनेने पाठपुरावा केला. अखेर याला यश आले. नुकतेच या उपचार केंद्राचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ‘एम्स’चे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. पी. जोशी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी, मिशन विश्व ममत्व फाऊंडेशनचा श्रद्धा जोशी, डॉ. बराई आदी उपस्थित होते. डॉ. जोशी म्हणाले, या केंद्रात मानसोपचार, एंडोक्राइनोलॉजी, यूरोलॉजी, त्वचारोग, प्लास्टिक सर्जरी विभागाचे तज्ज्ञ एकत्र येऊन एकाच ठिकाणी सेवा देतील. लिंग बदलांच्या शस्त्रक्रियेसह मानसोपचार, हार्मोनल उपचार आणि कॉस्मेटिक शस्त्रक्रियांसह सर्वच उपचार उपलब्ध असतील. दिल्ली एम्सनंतर भोपाळ आणि रायपूर एम्सलाही नुकतेच असे केंद्र सुरू झाले आहे.
नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी
डॉ. जोशी म्हणाले, ‘एम्स’मधील हा उपक्रम सर्वसमावेशक आरोग्यसेवेसाठी महत्त्वाचा आहे. सुरुवातीला आठवड्यात एक दिवस बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत हे केंद्र सुरू राहिल. कालांतराने रुग्णांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ होणार आहे. तृतीयपंथियांचा नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी असणार असून आवश्यक सर्व उपचारांच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.