नागपूर विभागातील सहा रेल्वेस्थानकांवर १६ लिफ्टस् व ८ एस्केलेटर्सची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2023 08:48 PM2023-01-02T20:48:55+5:302023-01-02T20:50:38+5:30
Nagpur News नागपूर विभागातील सहा रेल्वेस्थानकांवर १६ लिफ्ट आणि ८ एस्केलेटर लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची खास करून वृद्ध नागरिकांची चांगली सोय झाली आहे.
नागपूर : सोयी सुविधांबाबत विविध प्रवासी संघटना अन् लोकप्रतिनिधींकडून रेटून धरण्यात येणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, संपलेल्या वर्षात नागपूर विभागातील सहा रेल्वेस्थानकांवर १६ लिफ्ट आणि ८ एस्केलेटर लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची खास करून वृद्ध नागरिकांची चांगली सोय झाली आहे.
कोरोनाच्या काळात रेल्वेने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधांमध्ये कपात करण्यासोबतच हात आखडता घेण्याचे धोरण अवलंबिले होते. कोरोनाचा धोका टळल्यानंतरही रेल्वेचे हे धोरण तसेच सुरू असल्याचे पाहून रेल्वे प्रवाशांमध्ये रोष वाढला होता.
विशेष म्हणजे, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांची संख्या मोठी असते. यातील अनेकांना गुडखेदुखी, कंबरदुखीचा त्रास असतो. त्यामुळे ही मंडळी या फलाटावरून त्या फलाटावर पायऱ्या चढून चालत जाऊ शकत नाही. त्यामुळे अशांच्या सुविधांसाठी विविध रेल्वे प्रवासी संघटना तसेच लोकप्रतिनिधींकडून लिफ्ट तसेच एस्केलेटरची मागणी लावून धरण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या नागपूर विभागातील ठिकठिकाणच्या सहा रेल्वेस्थानकांवर वर्षभरात १६ लिफ्ट आणि ८ एस्केलेटर लावण्यात आले. या सुविधांमुळे रेल्वे प्रवाशांना खास करून वृद्ध नागरिक आणि बालकांना सोयीचे झाले आहे.
रेल्वेस्थानके आणि लिफ्टची सुविधा
वर्धा - ६ लिफ्ट, सेवाग्राम - ३, धामणगाव - २, बैतूल - २ पांढुर्णा - २ आणि अजनी - १
तर नागपूर रेल्वे स्थानकात ६ आणि अजनी स्थानकावर २ एस्केलेटर लावण्यात आले आहे.
----