फडक्यांच्या यज्ञवेदीवर, तीन नरवीर, बंधू चाफेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:12 AM2019-05-01T01:12:30+5:302019-05-01T01:16:24+5:30
क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचा कारागृहात यातना सहन करून मृत्यू झाल्याची बातमी दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी केसरी वर्तमानपत्रात वाचली आणि देशभक्तीचे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झाले. ही धग मनात पेटत होती. पुढे इंग्रज अधिकारी रॅँडने पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा अत्याचार चालविले आणि चाफेकर बंधूंचे रक्त खवळले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी रॅँडची हत्या केली. हभप योगेश्वर उपासनी महाराज चाफेकर बंधूंची कथा ऐकवित होते आणि उपस्थित प्रेक्षक रोमांचित होऊन हा धगधगता जीवनपट ऐकत होते. निमित्त होते राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचा कारागृहात यातना सहन करून मृत्यू झाल्याची बातमी दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी केसरी वर्तमानपत्रात वाचली आणि देशभक्तीचे विचारचक्र त्यांच्या मनात सुरू झाले. ही धग मनात पेटत होती. पुढे इंग्रज अधिकारी रॅँडने पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा अत्याचार चालविले आणि चाफेकर बंधूंचे रक्त खवळले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी रॅँडची हत्या केली.
हभप योगेश्वर उपासनी महाराज चाफेकर बंधूंची कथा ऐकवित होते आणि उपस्थित प्रेक्षक रोमांचित होऊन हा धगधगता जीवनपट ऐकत होते. निमित्त होते राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे. युवा झेप प्रतिष्ठानच्यावतीने राम शेवाळकर उपाख्य नानासाहेब शेवाळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याकरिता ‘अभिवादन शेवाळकर’ या त्रिदिवसीय राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन लक्ष्मीनगरातील राणी लक्ष्मीबाई सभागृह परिसरात करण्यात आले. या शृंखलेतील ‘चाफेकर बंधू’ या विषयावरील पहिले पुष्प योगेश्वर उपासनी महाराजांनी मंगळवारी गुंफले. देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात बाळ गंगाधर टिळकांची प्रेरणा घेऊन चाफेकर बंधूंंनी आपले प्राण देशास स्वाधीन केले. चाफेकर बंधू जाज्वल्य देशभक्त होते. चाफेकर बंधूंचा संपूर्ण जीवनपट उपासनी महाराजांनी कीर्तनातून नागपूरकरांच्या पुढे मांडला. लोकमान्य टिळकांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात दामोदर चाफेकरांचे शिवचरित्रावरील व्याख्यान तसेच गोफन्या मित्रमंडळाची स्थापना, चाफेकर बंधूनी रँडची हत्या कशा प्रकारे केली आदी जीवनप्रसंग उपासनी महाराजांनी आपल्या उद्बोधनातून जिवंत केले.
कीर्तन सादर करताना तबल्यावर प्रमोद बावने, व्हायोलिनवर सुधीर गोसावी, तालवाद्यावर श्रुती वाघ व हार्मोनियमवर श्रीकांत पिसे यांनी साथसंगत दिली. सायंटिफिक सोसायटीचे अध्यक्ष अरविंद गडीकर व नानासाहेब शेवाळकर यांची शिष्या माया ठाकरे यांच्या हस्ते महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रफुल्ल माटेगावकर, गजानन निशितकर, प्रसाद ओक, बाळासाहेब गजभिये यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.