राष्ट्रपती शासनासंदर्भात फडणवीसांनी ‘ड्राफ्ट’ केले होते राष्ट्रवादीचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 08:00 AM2023-02-15T08:00:00+5:302023-02-15T08:00:02+5:30
Nagpur News पहाटेच्या शपथविधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. परंतु, फडणवीसांनी पहिल्यांदाच हा दावा केलेला नाही.
योगेश पांडे
नागपूर : पहाटेच्या शपथविधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. परंतु, फडणवीसांनी पहिल्यांदाच हा दावा केलेला नाही. दोन वर्षांअगोदर नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान सर्वांत अगोदर फडणवीस यांनी यासंदर्भात गौप्यस्फोट केला होता व उघडपणे शरद पवार यांचे नाव घेतले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रपती शासनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र फडणवीसांनीच ‘ड्राफ्ट’ केल्याचा दावादेखील त्यांनी केला होता. मात्र, त्यावेळी राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता त्यावर जास्त वादळ उडाले नव्हते. विशेष म्हणजे, ‘लोकमत’कडेच त्या वक्तव्याचा ‘व्हिडीओ’ होता.
१७ नोव्हेंबर २०२१ रोजी नागपुरात व्यापाऱ्यांच्या एका कार्यक्रमात फडणवीस यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्तदेखील प्रकाशित केले होते. विशेष म्हणजे संबंधित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता व प्रसारमाध्यमांतीलच एका वरिष्ठ पत्रकाराने संबंधित मुलाखत घेतली होती. नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तास्थापनेची चर्चा झाली होती. भाजपचे बोलणे अजित पवार नव्हे, तर थेट शरद पवार यांच्याशी झाले होते. अगदी खातेवाटपाची चर्चादेखील अंतिम झाली होती, असा दावा त्यावेळी फडणवीस यांनी केला होता.
भाजप-राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांची नावेदेखील झाली होती निश्चित
नोव्हेंबर २०१९ मध्ये जे काही घडले ते मी का केले असे प्रश्न अनेकदा उपस्थित होतात. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविल्याची आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर १० ते १२ दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला व नंतर राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर त्यांच्याशी बोलणी केली. सरकार बनविण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण केली होती. अगदी खातेवाटपासह जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्तिच केले होते. राज्यात राष्ट्रपती शासन लागले व राष्ट्रवादीने त्यासाठी दिलेले पत्रदेखील मीच ‘ड्राफ्ट’ केले होते, असे फडणवीस यांनी प्रतिपादन केले होते.
‘फेसबुक लाईव्ह’वर केला होता गौप्यस्फोट
फडणवीस यांच्या नागपुरातील संबंधित कार्यक्रमाचे फडणवीस यांच्याच ‘लिंक’वरून ‘फेसबुक लाईव्ह’ सुरू होते. या कार्यक्रमात प्रसारमाध्यमे नाहीत, त्यामुळे मी दिलखुलासपणे बोलू शकतो, असे फडणवीस म्हणाले होते. पवारांबाबत त्यांनी गौप्यस्फोट केल्यावर काही वेळातच संबंधित ‘लिंक’ हटविण्यात आली होती. त्यामुळे निवडक लोकांनाच या गौप्यस्फोटाबाबत माहिती होती.