फडणवीस-राऊतांमध्ये रंगला श्रेयाचा कलगीतुरा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 06:49 AM2023-04-15T06:49:41+5:302023-04-15T06:50:20+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. या कन्व्हेंशन सेंटरची संकल्पनाच आपली असून, मंत्री असताना याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले, तर यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्री असताना या कामासाठी ८० कोटी दिले व आता पुन्हा १५ कोटी दिल्याचे सांगत ‘राऊतसाहेब थोडे श्रेय आम्हालाही द्या’, असा टोला लगावला.
उत्तर नागपुरातील कामठी रोडवर उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटात लोकार्पण झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, माजी मंत्री नितीन राऊत, प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री राजकुमार बडोले, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, माजी आ. डॉ. मिलिंद माने, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
या कन्व्हेंशन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी आणखी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. सोबत या सेंटरच्या मेन्टेनन्ससाठी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाउंडेशनसोबत करार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी वापर नको-गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे कन्व्हेंशन सेंटर कुठल्याही लग्न किंवा रिसेप्शनसाठी दिले तर मी सर्वप्रथम विरोध करीन, असे नासुप्र सभापतींना यावेळी बजावले.