एलईडी पथदिवे लावण्यात अपयश
By Admin | Published: December 29, 2016 02:46 AM2016-12-29T02:46:46+5:302016-12-29T02:46:46+5:30
नागपूर शहरातील विविध मार्गांवर १८ महिन्यांत २७ हजार एलईडी पथदिवे लावण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता.
कंत्राट रद्द : १८ महिन्यांत लावले फक्त ५७७ पथदिवे
नागपूर : नागपूर शहरातील विविध मार्गांवर १८ महिन्यांत २७ हजार एलईडी पथदिवे लावण्याचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. त्यानुसार मे. जे.के. सोल्युशन्स इंक या कंपनीला कंत्राट देण्यात आला होता. परंतु या कंपनीला फक्त ५७७ पथदिवे लावता आल्याने हा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
एलईडी पथदिवे लावण्यासोबतच या कंपनीवर नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेले खांब हटविणे, नवीन खांब उभारण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु काम समाधानकारक नसल्याने कंपनीला १० जुलै २०१६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही कामात सुधारणा न झाल्याने कंपनीचा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निर्धारित १८ महिन्यांच्या कालावधीत २७ हजार पथदिवे लावण्यात यश आले असते तर ९.१६ कोटींची वीज बचत झाली असती. यातील १० टक्के रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार होती. परंतु कंपनीला यात यश आले नाही. त्यामुळे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी दिली.
आता झोनस्तरावर एलईडी पथदिवे लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली.(प्रतिनिधी)
झोनस्तरावर देखभाल व दुरुस्ती
शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुुरुस्तीचे कंत्राट आजवर केंद्रीयस्तरावर दिले जात होते. परंतु आता हे काम झोनस्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. कंत्राटदाराला एलईडी दिवे लावणे, बंद पथदिव्यांची दुरुस्ती, खांब बदलणे आदी कामे करावयाची आहेत. कंत्राट अधिक रकमेचा असला तरी यातून महापालिकेची मोठी आर्थिक बचत होईल, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी दिली.