अपयश म्हणजे अंत नाही
By admin | Published: June 1, 2017 02:17 AM2017-06-01T02:17:35+5:302017-06-01T02:17:35+5:30
मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता.
हे आहेत आयुष्याचे शिल्पकार : प्रतिकूलतेवर मात करून घडविला इतिहास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल तसा बारावीचा होता, आयुष्याचा नव्हता. पण, मनासारखे यश न मिळाल्याने अंतर्बाह्य खचलेल्या वणीच्या कोमल चचाणे हिने गळफास घेतला, औरंगाबादच्या मनीषा गायकवाड हिने स्वत:ला रेल्वेसमोर झोकून दिले, नवी मुंबईतील पृथ्वी व्हावळ यानेही फास गळ्यात अडकवला. केवळ विद्यार्थीच नाहीत तर एका ठिकाणी पालकाने मुलाला अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून स्वत:लाच संपवून टाकले. किती टोकाचे नैराश्य? इतकी अशक्त झालीत आमची मने? परीक्षेतील अपयश हे आयुष्याच्या अंताचे कारण होऊ शकते का? पण, पालकांच्या तथाकथित प्रतिष्ठेपोटी निर्माण झालेले प्रचंड अपेक्षांचे ओझे मुलांना पेलवत नाही आणि ते अशा आत्मघाताकडे वळतात. प्रतिकूलतेचे असे प्रसंग राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक, प्रसिद्ध कलावंत, अशा सर्वांनीच पाहिले. परंतु ध्येयाप्रति प्रामाणिक निष्ठा आणि स्वत:वरचा आत्मविश्वास या बळावर यांनी खेचून आणला यशाचा मंगलकलश. सारांश... कुठलेही अपयश म्हणजे आयुष्याचा अंत नसतो, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी लोकमतने पुढाकार घेतला असून आज आयकॉन ठरलेल्यांनी अपयशातूनच कसा यशाचा मार्ग शोधला त्याचीच ही काही प्रेरणादायी उदाहरणे...
इंजिनिअरिंग की वकिली अशा द्वंद्वात मी सापडलो होतो. वकील व्हायची माझी इच्छा नव्हती. पण, वडिलांनी मला समजावले आणि शेवटी मी एल.एल.बी.ला प्रवेश घेतला. सुरुवातीला वाटायचे की आपण चुकीचे तर करत नाही ना? पण, इंजिनिअरिंग किंवा आयएएस झाल्यानंतर मिळाले नसते तो आनंद आज मला न्यायदानाच्या क्षेत्रात मिळत आहे. आज मला माझे करिअर घडविल्याचा अभिमान वाटतो. द्वंद्वांचे असे प्रसंग आयुष्यात येतच असतात. शेवटी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
- न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालय.
मुलाला इंजिनिअर बनवू शकत नाही याचे दु:ख आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. शेवटी पैशाअभावी प्रवेश घेऊ शकलो नाही. बीएस्सीला प्रवेश घेतला. पण मी नैराश्याच्या गर्तेत बुडालो होतो. तणावात मी बीएस्सी सेकंड इयर सोडले. गावात किराणा दुकान सुरू केले. दूध विकू लागलो. तेथे मन रमत नव्हते. शेवटी आॅटो चालवला.सोबतीला सामाजिक काम होते. याच सामाजिक आंदोलनातून राजकारणात आलो. नैराश्यावर मात करून मी माझ्या आयुष्याची नवी वाट निर्माण केली.
- चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर
आयआरएससाठी निवडल्या गेलो. पण, ते माझे ध्येयच नव्हते. पुन्हा नव्याने परीक्षा दिली आणि तिसऱ्या प्रयत्नात आयएएससाठी सिलेक्ट झालो. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण केले. दहावीला ८०.१४ टक्के गुण पडले. मेरिट आलो नाही म्हणून निराश झालो नाही. आणखी अभ्यास केला. बारावीला ८८.५० टक्के गुण मिळाले. यूपीएससीची तयारी सुरुच होती. पहिल्या प्रयत्नात खूप कमी फरकाने संधी हुकली. वाईट वाटले परंतु निराश झालो नाही.आणखी जिद्दीने अभ्यास केला.
सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी, नागपूर