फोनवर म्हणाला अपहरण झालं, रात्रभर शोधत होते पोलीस; मग झाले असे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 02:30 PM2021-12-02T14:30:26+5:302021-12-03T10:10:23+5:30
दारू पिऊन घरी गेल्यास बायको रागावेल या भीतीने एका व्यक्तीने बायकोला फोन करून अपहरण झाल्याचे सांगितले आणि अचानक फोन बंद झाला. भांबावलेल्या बायकोने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
नागपूर : अपघातानंतरअपहरण झाल्याचा फोन करून एका व्यक्तीने चांगलीच खळबळ उडवून दिली. भांबावलेल्या स्थितीत एक महिला पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पतीचे अपहरण झाल्याचे पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी रात्रभर संपूर्ण शहर पिंजून काढले व हा पठ्ठ्या दुसऱ्या दिवशी सुखरुप स्थितीत एका पुलाखाली मद्यधुंद अवस्थेत आढळून आला.
गजेंद्र कोहरे (२६) असे अपहृताचे नाव आहे. तो मुळचा मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पत्नी सुरेखासह नागपुरात कामाच्या शोधात आला होता. सध्या तो गुमगावर मार्गावर असलेल्या महालक्ष्मी लॉनमध्ये मजुरीचे काम करतो व तेथेच राहतो. नेहमीप्रमाणे गजेंद्र मंगळवारी सकाळी काही कामानिमित्त दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. त्याने पत्नीला लवकर येतो असे सांगितले मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही. दरम्यान दुपारच्या वेळी त्याने पत्नी सुरेखाला फोन करून त्याच्या दुचाकीला अपघात झाला. व काही लोकांनी त्याला वाहनात बसवून अज्ञात स्थळी नेले. तेथे नेऊन मारहाण केली व बांधून ठेवले असल्याचे सांगितले आणि त्याचा फोन कट झाला.
हा प्रकार ऐकताच सुरेखाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने गजेंद्रला फोन लावायचा प्रयत्न केला. परंतु, फोन वारंवार बंद येत होता. त्यामुळे ती आणखीनच घाबरली अन् पोलीस ठाणे गाठून पतीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
दरम्यान, या घटनेची वरिष्ठांना माहिती दिली गेली. वरिष्ठांच्या निर्देशावरून अपहृत आणि अपहरणकर्त्यांचा शोध सुरू झाला. अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करीत संपूर्ण हिंगणा परिसरात शोध घेतला. मात्र, त्याचा कुठेच शोध लागला नाही. पोलिसांनी संपूर्ण रात्र पिंजून काढली. अखेर बुधवारी सकाळी तो एका पुलाजवळ सुरक्षित मिळाला. ही माहिती त्याच्या पत्नीला देण्यात आली. पती सुखरूप असल्याची माहिती मिळताच सुरेखाचा जीव भांड्यात पडला व पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला
दारूची नशा अन् बायकोचा धाक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो सकाळपासूनच दारूच्या नशेत होता. अशा स्थितीत घरी घरी गेल्यास बायको चांगलीच खरडपट्टी काढेल, या भीतीने त्याने पत्नीला फोन करून खोटनाटं सांगितलं. बोलता-बोलता त्याचा फोनही बंद झाला. पुढचे त्याला काहीही आठवत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तो सुखरुप घरी आल्याने बायकोला आनंद झाला असला तरी, पोलिसांची मात्र, रात्रभर चांगलीच तारांबळ उडाली.