तोतया सीबीआय अधिकाऱ्याला रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून लाच घेताना अटक
By योगेश पांडे | Published: November 2, 2023 10:57 PM2023-11-02T22:57:10+5:302023-11-02T22:57:18+5:30
संबंधित आरोपीने अशा पद्धतीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे याची चौकशी सुरू आहे.
नागपूर : सीबीआयच्या उपमहानिरीक्षकांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करत एका रेल्वे अधिकाऱ्याला २० लाखांची लाच मागणाऱ्या आरोपीला सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपीने अशा पद्धतीने आणखी किती जणांना गंडा घातला आहे याची चौकशी सुरू आहे.
सादिक कुरेशी असे आरोपीचे नाव आहे. तो सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन स्वत:ला सीबीआयच्या नागपूर युनिटच्या उपमहानिरीक्षकांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करायचा. त्याने मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंत्याविरोधात तक्रारी असल्याचा खोटा दावा त्याने केला व कारवाईपासून वाचविण्यासाठी २० लाख रुपये लागतील असे सांगितले. पैसे दिले तर तक्रारीचा निपटारा होऊन जाईल, असे त्याने त्यांना सांगितले. कुठलेच चुकीचे काम केले नसताना तक्रार कशी होईल या विचारातून रेल्वेच्या अधिकाऱ्याने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली.
सीबीआयच्या नागपूर कार्यालयात अशा नावाचा कुठलाही व्यक्ती नसल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले. आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या निवासस्थानी आणि त्याच्याशी संबंधित इतर परिसरात झडती घेण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.