'तोतयां'मुळे पोलिसांच्या नाकीनऊ, दिवसभरात चार नागरिकांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 02:42 PM2022-03-26T14:42:10+5:302022-03-26T14:47:42+5:30
या घटना अंबाझरी, बेलतरोडी, हुडकेश्वर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. या घटनातील आरोपी अद्यापही मोकाट असल्यामुळे आणखी काही नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर : उपराजधानीत तोतया पोलिसांनी गुरुवारी हैदोस घातला. परिसरात चोऱ्या होत असून तुम्ही सोन्याची चेन, अंगठी कशाला घालून फिरत आहात. आम्ही पोलीस असून तुमच्याकडील सोन्याची चेन, अंगठी काढून ठेवा अशी बतावणी करून भामट्यांनी मॉर्निंग वॉक करून घरी परत जाणाऱ्या चार नागरिकांचे ४.२० लाखाचे सोने पळविले.
या घटना अंबाझरी, बेलतरोडी, हुडकेश्वर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. या घटनातील आरोपी अद्यापही मोकाट असल्यामुळे आणखी काही नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पहिल्या घटनेत अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास श्रीपत माधवराव पाटील (७४, रविनगर शासकीय निवासस्थान) हे मॉर्निंग वॉक करून घरी परत जात होते. तेवढ्यात सीपी क्लबजवळ प्रादेशिक विद्या विकास प्राधिकरण रविनगर जवळील वळणावर दोन आरोपींनी आपली दुचाकी बाजूला थांबविली. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगितले. परिसरात चोऱ्या होत असताना सोन्याची चेन, अंगठी काढून ठेवण्यास त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपींनी नजर चुकवून पाटील यांची सोन्याची अंगठी व चेन असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
दुसऱ्या घटनेत बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ९.१० वाजता अशोककुमार संपतराव देशभ्रतार (६५, चिरंजीवनगर, नरेंद्रनगर एक्स्टेंशन) हे मॉर्निग वॉक करून घरी जात होते. ३५ ते ४० वयोगटातील तीन आरोपींनी आपण पोलीस असल्याचे सांगून त्यांची सोन्याची चेन, अंगठी असा १.२८ लाखाचा मुद्देमाल चोरी केला.
तिसऱ्या घटनेत हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी १०.४० वाजता कृष्णराव पुंडलिक बोकडे (५५, ताजेश्वरनगर) हे दुचाकीने जात होते. चार अनोळखी इसम दोन मोटारसायकलवर त्यांच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून तोंडाला मास्क लावून सोन्याचे ४२ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन त्यांची फसवणूक केली.
चौथ्या घटनेत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सुरेश किसन भगत (६५, उरुवेला कॉलनी, धंतोली) हे दुचाकीने जात होते. दोन अनोळखी आरोपींनी आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची सोन्याची चेन, अंगठी किंमत १.८० लाख असा मुद्देमाल घेऊन त्यांची फसवणूक केली. चारही घटनात पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.