काय सांगता! चाळीस लाखांच्या बदल्यात एक कोटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 12:54 PM2021-11-22T12:54:34+5:302021-11-22T13:47:21+5:30

साैद्याची सुरुवात किमान चाळीस लाखांपासून होते. चाळीस लाख द्या अन् एक कोटी रुपये घेऊन जा. नोटांची डिलिव्हरी पाहिजे, त्या ठिकाणी (घरपोच) देण्याची तयारीही टोळी दाखविते.

fake currency fraud One crore in exchange for forty lakh rupees | काय सांगता! चाळीस लाखांच्या बदल्यात एक कोटी...

काय सांगता! चाळीस लाखांच्या बदल्यात एक कोटी...

Next
ठळक मुद्देनकली नोटांचा खेळ : असली फसवणूक अडीच पट नोटा देण्याचे आमिष : बिनबोभाट सुरू आहे टोळीची डावबाजी

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : असली नोटांच्या बदल्यात असली वाटणाऱ्या अडीच पट नकली नोटा देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रोकड हडपणारी टोळी नागपुरात सक्रिय आहे. गेल्या काही वर्षांत या टोळीने अनेकांकडून कोट्यवधी रुपये हडपले आहे. मात्र, लाखो रुपये गमावणाऱ्या कुणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही, हे विशेष.

या टोळीतील गुन्हेगारांचे नेटवर्क काही फायनान्स कंपन्यांच्या अवतीभवती आहे. फायनान्सच्या गोंडस नावाखाली छोटे मोठे कर्ज देणाऱ्या एजंटला या टोळीचे सदस्य हेरतात. प्रारंभी काही दिवस त्याची विश्वसनीयता तपासल्यानंतर, त्याला वेगवेगळे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. नंतर त्याला सावज शोधायला सांगतात. आमच्याकडे कोट्यवधींचे नकली नोट आहेत. तुम्ही ते कोणत्याही बँकेत तपासले, तरी ते नोट नकली आहे, हे उघड होणार नाही, अशी हमी या टोळीकडून दिली जाते. त्याचे प्रात्यक्षिकही दाखविले जाते. त्यातून विश्वास पटल्यानंतर सावज हेरण्यासाठी संबंधित व्यक्ती इकडे-तिकडे विचारणा करतो. धनाड्य व्यक्ती, अवैध धंदे करणारी मंडळी, तसेच पैशाचे लालस असलेली मंडळी अडीच पट जास्त रक्कम मिळणार म्हणून या टोळीच्या आमिषाला बळी पडते. साैद्याची सुरुवात किमान चाळीस लाखांपासून होते. चाळीस लाख द्या अन् एक कोटी रुपये घेऊन जा. नोटांची डिलिव्हरी पाहिजे, त्या ठिकाणी (घरपोच) देण्याची तयारीही टोळी दाखविते.

(१) फसवणुकीचा डाव

लाखोंची रोकड आरोपींच्या हातात ठेवण्यापूर्वी संबंधित व्यक्ती आरोपींकडे असलेल्या काही नोटा घेऊन, त्या काही बँक अधिकाऱ्यांना दाखवितात. एटीएममधूनही तपासून घेतात. त्या नोटा (ज्या नकली आहे, असे आरोपी सांगतात) असलीच असल्याने बँकेचे अधिकारी, एटीएम ‘नोटा असली’ असल्याची पुष्टी करतात. त्यामुळे आरोपींनी केलेला ‘नोटा नकली असल्याचे कुणी ओळखणार नाही,’ हा दावा खरा असल्याचे मानले जाते अन् येथेच आरोपींचा फसवणुकीचा पहिला डाव यशस्वी होतो.

(२) ...अन् पडतो पोलिसांचा छापा

या टोळीचे कार्यक्षेत्र, हंसापुरी खदान, नंदनवन भागात आहे. टोळीतील बहुतांश सदस्य बोलबच्चन आहेत. त्यांच्या थापेबाजीला बळी पडलेली मंडळी लपत छपत या टोळीच्या पॉश कार्यालयात लाखोंची रोकड घेऊन जाते. नोटा मोजण्याचे काम सुरू असतानाच, अचानक पोलिसांचा त्या ठिकाणी छापा पडतो अन् नोटा देणारी, तसेच घेणारी मंडळी अडगळीच्या जागी नोटा फेकून पळून जातात.

(३) काळे धन, बोलणार कोण

पोलिसांचा छापा पडल्यानंतर नोटा गमावलेली मंडळी थेट आपल्या घराचा रस्ता धरतात. पोलिसांना आपले नाव माहीत पडल्यास चाळीस लाखांसारखी रक्कम एकमुश्त कुठून आणली, असा प्रश्न पोलीस करणार. हे काळेधन आहे का, याचीही चाैकशी होणार, त्यात एक कोटींच्या नकली नोटा घेण्यासाठी आपण आलो होतो, हे पोलिसांना सांगितले, तर आपणच गुन्हेगार ठरू, अशी भीती लाखोंची रोकड गमावलेल्यांच्या मनात असते. त्यामुळे ही पीडित मंडळी गप्प राहणेच पसंते करते. छापा टाकणारे पोलीस नकली आहेत, असा विचारही ही मंडळी करत नाही.

Web Title: fake currency fraud One crore in exchange for forty lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.