बनावट नोटा तस्करांचे ग्रामीण भागात नेटवर्क
By admin | Published: May 7, 2016 02:51 AM2016-05-07T02:51:06+5:302016-05-07T02:51:06+5:30
महानगरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याने पकडले जाण्याचा धोका वाढल्यामुळे बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या तस्करांनी आता ग्रामीण भागात आपले नेटवर्क तयार केले आहे.
महानगरातील धोका टाळण्यासाठी तस्करांची क्लृप्ती : कोट्यवधींची उलाढाल
नरेश डोंगरे नागपूर
महानगरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याने पकडले जाण्याचा धोका वाढल्यामुळे बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या तस्करांनी आता ग्रामीण भागात आपले नेटवर्क तयार केले आहे. परिणामी ग्रामीण भागात कोट्यवधींच्या बनावट नोटांची बिनबोभाट उलाढाल सुरू आहे. खास सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या गोरखधंद्याला आळा घालण्यासाठी राज्यातील सुरक्षा यंत्रणेने कोलकाता (पश्चिम बंगाल) पोलिसांना बनावट नोटांची खेप आणणाऱ्यांची सचित्र माहिती देऊन त्यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना दिल्याचीही खास सूत्रांची माहिती आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात नियमित मोठ्या प्रमाणावर ५०० आणि १००० च्या बनावट नोटा आणल्या जातात. पाकिस्तानातून नेपाळ सीमेवरून बिहार आणि उत्तरप्रदेशात बनावट नोटांची खेप पोहचते. या नोटा नंतर हरियाणा, पंजाब, दिल्ली, नोएडा आणि अन्य महानगरात पोहचविल्या जातात. तर, बांगलादेशातून कालीयाचक, मालदा (कोलकाता) मार्गे नागपुरात रेल्वेने नोटांची खेप येते. येथून छत्तीसगड, मध्यप्रदेशासोबतच मध्यभारतातील अनेक प्रांतात या बनावट नोटा पाठविल्या जातात. बनावट नोटांची खेप आणण्यासाठी कोलकाता नजिकच्या मालदा गावाचे नाव सर्वत्र घेतले जाते.
तस्करांवर विशेष नजर
नागपूर : कोलकाता नजिकच्या मालदा या गावातील बेरोजगार आणि भोळ्या भाबड्या तरुणांना पैशाचे आमिष दाखवून बनावट नोटांची खेप पोहचविण्यासाठी प्रवृत्त केले जाते. मालदा गावातील अनेक जण बनावट नोटांच्या तस्करीत बेमालूमपणे ओढले गेले असून, त्यातील अनेक तस्कर पोलिसांच्या हातीही लागले आहेत. नागपुरात वारंवार बनावट नोटा येत असल्याचे ध्यानात आल्यामुळे शहर पोलीस, दहशतवादी विरोधी पथक, रेल्वे पोलीससह सुरक्षा यंत्रणांनी बनावट नोटांच्या तस्करांवर विशेष नजर रोखली. विविध महानगरातील पोलिसांनाही त्यांची माहिती देण्यात आली. त्यानंतर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना नागपूरसह अनेक मोठ्या शहरात पकडण्यात आले. महानगरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याचे ध्यानात आल्याने तस्करांनी महानगरावरून आपली नजर छोट्या शहरांवर आणि ग्रामीण भागात वळवली. त्यासाठी ठिकठिकाणी आपले हस्तक तयार केले. (प्रतिनिधी)
महिनाभरापूर्वी झाला खुलासा
चार महिन्यांपूर्वी एटीएसने रेल्वेस्थानकावर तीन तस्करांना ९ लाखांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. त्यात चंद्रपूरचे दोन आणि मालदा (पश्चिम बंगाल) येथील एक आरोपी होता. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून, सुरक्षा यंत्रणेला जबर धक्का बसला. सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याने मोठ्या शहरात (नागपूर, पुणे, औरंगाबाद सारख्या महानगरात) बनावट नोटा पकडण्याचा धोका जास्त असल्याचे लक्षात आल्याने तस्करांनी नोटांची खेप मोठ्या नव्हे तर छोट्या शहरात पोहचता करण्यावर भर दिल्याचे उघडकीस आले. त्यानुसार, कामठी, काटोल, बुटीबोरी, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि विदर्भातील ठिकठिकाणच्या छोट्या शहरात बनावट नोटांची लाखोंची खेप नियमित पोहचत असल्याचे पुढे आल्याची माहिती आहे. चंद्रपूर, चिमूर आणि हिंगणघाटसह ठिकठिकाणी करण्यात आलेल्या (पकडण्यात आलेल्या) कारवाईमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला. केवळ विदर्भ, महाराष्ट्रच नव्हे तर तस्कर नागपुरातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही बनावट नोटांची लाखोंची खेप नियमित पोहचता करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. आठवडी बाजार, बसस्थानकांवर या बनावट नोटा सहजपणे चालविल्या जातात. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चालविल्या जात असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. सट्टा आणि हवाला व्यवहारातही बनावट नोटांचा वापर होतो, हे सर्वश्रुत आहे.
कोलकाता पोलिसांना माहिती
चंद्रपूर आणि मालद्यातील तस्कर हाती लागल्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक युनिटने कोलकाता पोलिसांना काही दिवसांपूर्वी तस्करांची सचित्र माहिती पुरविली. त्यांच्यावर नजर ठेवण्याच्याही सूचना दिल्या. त्यानुसार, मालद्यातील ओबेदुल्ला याला चार लाखांच्या बनावट नोटांसह महिनाभरापूर्वी कोलकाता पोलिसांनी पकडले. ६ एप्रिलला एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही उपरोक्त माहितीला दुजोरा मिळाला.